शाळांची मागणी नसल्याने बससेवाही बंदच
By | Published: December 8, 2020 04:17 AM2020-12-08T04:17:50+5:302020-12-08T04:17:50+5:30
सुपा : विद्यार्थ्यांसाठी एसटी बससेवा सुरू करण्याबाबत संबंधित गावातील शाळांनी मागणी केली नाही. त्यामुळे बससेवा बंदच आहे, अशी माहिती ...
सुपा : विद्यार्थ्यांसाठी एसटी बससेवा सुरू करण्याबाबत संबंधित गावातील शाळांनी मागणी केली नाही. त्यामुळे बससेवा बंदच आहे, अशी माहिती पारनेर आगाराचे व्यवस्थापक पराग भोपळे यांनी दिली. बस नसल्याने प्राथमिक, माध्यमिक शाळेसाठी जाणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची गैरसोय होत आहे.
२३ नोव्हेंबरपासून शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्यासाठी संबंधित वर्गाला शिकवणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असून विद्यार्थ्यांसाठी पालकांचे सन्मतीपत्रक आवश्यक आहे. सुप्यातील शिक्षकासह परिसरातील शाळेतील कर्मचाऱ्यांची २० नोव्हेंबर व त्यानंतर ज्यांची तपासणी झाली त्यांचे अहवाल प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे पंधरवाडा होऊन विद्यार्थ्याविनाच शाळा भरत आहे.
एसटी बंद असल्याने जवळच्या गावातील शहजापूर, आपधूप, वाघुंडे, वाळवणे, रुईछत्रपती, रांजणगाव, रायतळे, अस्तगाव, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी, पिंप्री गौळी, गणेशवाडी येथून येणाऱ्या मुलांनी सुपा, पारनेर, नगर, शिरूर येथे शिक्षणासाठी कसे जावे व परतावे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. शिक्षकांना गृह भेटी, स्वाध्याय घेणे, तपासणे आदी कांमासाठी विद्यार्थ्यांच्या घरी जाणे क्रमप्राप्त असून काही शाळेमध्ये शिक्षकांना बोलावले जात आहे. त्यांची बससेवेअभावी गैरसोय होत आहे.
....
एसटी बस सेवेबाबत कुठल्याही शाळेने आमच्याकडे मागणी केलेली नाही. त्यामुळे आम्ही डेपोकडे मागणी नोंदवली नाही.
-बाळासाहेब बुगे,
गटशिक्षणाधिकारी, पारनेर