पावसामुळे पारनेर तालुक्यातील फुल शेतीचे कोट्यवधीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 04:31 PM2017-10-18T16:31:31+5:302017-10-18T16:35:56+5:30
गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे.
सुपा : पावसामुळे पारनेर तालुक्यातील गोरेगाव व सुपा परिसरातील फुल उत्पादक शेतक-यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. फुले भिजल्यामुळे भाव गडगडले असून, शेतक-यांचा वाहतूक खर्चही निघत नाही़
तालुक्यातील सुपा परिसर व गोरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. दीपावलीच्या काळातच नेमके परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे फुलशेतीत पाणी साठले तर फुले भिजल्याने त्यांचा रंग बदलून काळपट दिसू लागले. काही फुले ओली झाल्याने त्यांची मागणी घटली. कल्याणला शेवंतीला दहा रुपये प्रति किलो असा भाव मिळत असल्याने फुले तोडण्याचा व वाहतुकीचाही खर्च भागत नसल्याचे पाडळी येथील फुल उत्पादक विजय धोंडिबा दावभट यांनी सांगितले. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्याने शेवंती लागवडीस उशीर झाला. त्यामुळे गणेशोत्सव व नवरात्रौत्सव काळात फुले उमलली नाही. या दोन्ही उत्सव काळात फुलांना मोठी मागणी असते. गणेशोत्सवाचे व नवरात्रोत्सवाच्या प्रत्येकी १०-१० दिवसात चांगले पैसे होतात. परंतु या वर्षी या काळात फुले न फुलल्याने उत्पन्न बुडाले. त्यानंतर दिवाळीतही पावसाने झोडपल्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुपा परिसरातील गावाना नगर, पुणे रोडमुळे तातडीने फुले बाजारात पाठवत येतात तर गोरेगाव, हिवरे कोर्डा, पाडळी या गावातून फुले नगरसह कल्याण मार्केटला फुले पाठविली जातात.
बाहेरच्या राज्यातून व्यापारी थेट गोरेगावमध्ये येऊन फुले खरेदी करतात़ या वर्षीही बाहेरचे व्यापारी आले. परंतु पावसाने फुलझाडे आडवी झाली, फुले खराब झाले. त्यामुळे मागणी असून फुले खराब झाल्याने नगदी उत्पन्न घटले. काही शेतक-यांचे संपूर्ण पीकच वाया गेले.
मार्केटला जाणा-या फुलविक्रीतून शेतक-यांचा किमान वाहतूक खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरेगावमधून दररोज सुमारे ६०० कॅरेट फुलांची कल्याणला निर्यात होत असे. एका कॅरेटमध्ये १० किलो फुले असतात. परंतु आता फुले खराब झाल्याने ही निर्यातही जवळपास थांबली आहे. त्यामुळे शेतक-यांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आप्पा नरसाळे यांनी सांगितले.