ढिसाळ नियोजनामुळे होरपळली शेकडो हेक्टर शेती

By Admin | Published: May 5, 2017 12:55 PM2017-05-05T12:55:54+5:302017-05-05T12:55:54+5:30

निळवंडे, भंडारदरा, आढळा असे तीन मोठे धरण आणि ११ छोटे धरण असलेल्या अकोले तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे होरपळली आहे़

Due to poor planning, hundreds of hectares of farming | ढिसाळ नियोजनामुळे होरपळली शेकडो हेक्टर शेती

ढिसाळ नियोजनामुळे होरपळली शेकडो हेक्टर शेती

आॅनलाइन लोकमत
कोतूळ (अहमदनगर), दि़ ५ - निळवंडे, भंडारदरा, आढळा असे तीन मोठे धरण आणि ११ छोटे धरण असलेल्या अकोले तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे होरपळली आहे़
गेल्या पाच वर्षांपासून धरणांच्या बारमाही पाण्याच्या सुखद स्वप्नाने अकोले तालुक्यातील शेतकरी हुरळून गेला. मात्र कोतूळ, धामणगावपाट, पाडाळणे, अंभोळ, मोग्रस या पाच गावांतील शेकडो हेक्टर शेती पाण्याअभावी होरपळून गेली आहे़ या शेकडो हेक्टर क्षेत्रातले चारा, ऊस, डाळिंब, भाजीपाला पाण्याअभावी जळून खाक झाला आहे. पाटबंधारे विभागाचे ढिसाळ नियोजन व गाव पुढाऱ्यांच्या हट्टीपणामुळे धरणांच्या बॅकवॉटर पट्ट्यातील शेतीच जळून गेली असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
माजी मंत्री मधुकरराव पिचड, दिवंगत नेते यशवंत मेचकर, यमाजी लहामटे यांच्या प्रयत्नातून पश्चिम घाटातले पाणी वळवून पिंपळगाव, अंबित, कोथळा, देवहंडी, बलठण, घोटी या लघुप्रकल्पात पाणी आणले़ त्यातून या छोट्या धरणांमध्ये एकूण दीड टीएमसी पाणी साठले़ तर मुळा नदीवरील खडकी, शिसवद, साकिरवाडी, पैठण, पाडाळणे, धामणगावपाट, पिंपळगाव या कोतूळपर्यंतच्या पट्ट्यात असलेल्या बंधाऱ्यांमध्ये दीड टीएमसी पाणी साठले. मात्र पाडाळणे, धामणगावपाट, अंभोळ, मोग्रस, कोतूळ या गावातील शेतकऱ्यांना बेभरवशाच्या आवर्तनांनी देशोधडीला लावले़ ही गावे पिंपळगाव धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात येतात. पाडाळणे ते कोतूळ या आठ किलोमीटरच्या मुळा नदी काठावरच्या शेतकऱ्यांनी कोट्यावधींचे कर्ज काढून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतीसाठी पाणी पुरवठा योजना केल्या. मात्र जानेवारी महिन्यात कोतूळचा पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा, म्हणून महाशिवरात्रीच्या निमित्ताने पिंपळगाव प्रकल्पातून एकाच आवर्तनात चाळीस टक्के पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धामणगावपाट, मोग्रस, कोतूळचा अर्धा भाग गेल्या चार महिन्यांपासून पश्चिमेच्या अंबित, बलठण, घोटी, देवहंडी, कोथळा या प्रकल्पाच्या आवर्तनाची वाट पहात आहेत. मृत साठा वगळता या लघु प्रकल्पांत १७५ दलघनफुट पाणी शिल्लक आहे तर कोतुळ पर्यंत पाणी येण्यासाठी केवळ शंभर दलघनफुट पाणी लागते. मात्र पाणी वाटप निश्चित नसल्याने पाच गावातील शेतकऱ्यांची उभी पिके जळाली आहेत.

Web Title: Due to poor planning, hundreds of hectares of farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.