Ahmednagar: महापालिकेच्या उदासिनतेमुळे शौचालयांसाठी आलेला ४ कोटींचा निधी परत गेला
By अरुण वाघमोडे | Published: October 17, 2023 05:31 PM2023-10-17T17:31:42+5:302023-10-17T17:31:52+5:30
Ahmednagar: महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आणि शहरात सार्वजनिक शौचालयांची वाणवा असताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मनपाला शौचालय उभारणीसाठी आलेला तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे परत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
- अरुण वाघमोडे
अहमदनगर - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आणि शहरात सार्वजनिक शौचालयांची वाणवा असताना स्वच्छ भारत अभियानातंर्गत मनपाला शौचालय उभारणीसाठी आलेला तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे परत गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत मनपात मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती गणेश कवडे यांच्यासह सभागृह नेते विनित पाऊलबुधे यांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.
सभापती कवडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. यावेळी नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेवक मुद्दसर शेख, प्रदिप परदेशी, नज्जू पैलवान, पल्लवी जाधव, सुनीता कोतकर, मंगल लोखंडे आदी उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानातंर्गत महापालिकेला सार्वजनिक शौचालये उभारणीसाठी आलेला ४ कोटींचा निधी शासनाकडे परत कसा गेला, याला जबाबदार कोण तसेच याबाबत आपण काय कारवाई केली. असा प्रश्न नगरसेवक पाऊलबुधे यांनी उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदिप पठारे यांनी निधी खर्च करण्यासाठी वेळ कमी होता व जागा निश्चित झाली नाही. तसेच आधी घनकचरा विभाग दुसऱ्या अधिकाऱ्याकडे होता. असे उत्तर दिले. यावर सभापती कवडे यांच्यासह पाऊबुले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शासनाकडून आलेल्या निधीबाबत अधिकारी पदाधिकाऱ्यांना माहिती देत नाहीत. तसेच निधीचा योग्य व वेळेत विनियोग करत नाहीत. त्यामुळेच हा निधी परत गेला. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा, अशी मागणी पाऊलबुधे यांनी केली. यावर सभापती कवडे यांनी आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.