यंग ब्रिगेडमुळेच सुपा एमआयडीसीतील कारखान्यांची चक्रे गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:21 AM2021-04-27T04:21:11+5:302021-04-27T04:21:11+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कारखान्यांची चक्रे गतिमान ठेवण्यासाठी यंग ब्रिगेड सरसावली आहे. मनात भीती असली तरी त्यावर ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील कारखान्यांची चक्रे गतिमान ठेवण्यासाठी यंग ब्रिगेड सरसावली आहे. मनात भीती असली तरी त्यावर आत्मविश्वासाने मात केल्याने मिळालेले बळ मोठे असल्याचे या तरुणाईने सांगितले.
सुपा औद्योगिक वसाहतीत जुनी औद्योगिक वसाहत व टोल नाक्याजवळील परिसरातील विस्तारित टप्पा क्रमांक दोनची एमआयडीसी असे दोन भाग असून नवीन एमआयडीसीत के एसपीजी, मिंडा, कॅरिअर मायडिया आणि मायडिया अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत. यातील कारखान्यात नव्याने भरती करण्यात आलेले कामगार तरुण आहेत. खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील ही तरुण मुले, मुली यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. ही मंडळी आजाराला घाबरत नसली तरी त्यांची काळजी त्या त्या कारखाना प्रशासनाकडून घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर याबाबी गेल्या वर्षभरापासून काटेकोरपणे पाळल्याने फक्त दोन कामगार वगळता कुणालाही या आजाराची बाधा होऊ शकली नसल्याचे केएसपीजीचे व्यवस्थापक शिवाजी झनझने यांनी सांगितले. जवळपास ४० टक्के उत्पादन प्रक्रिया सुरू आहे.
कंपनी रोलवर काम करणाऱ्यांसाठी बस सुविधा असून नियमांचे पालन करीत ही तरुण मुले कामावर येतात. कामगारांची तपासणी करून गरज असेल त्याच्यावर उपचार, भोजन कक्षात फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनरने तपासणी अशी खबरदारी घेतली जात असल्याने तरुण कामगार घरी बसण्यापेक्षा कामावर येण्याला पसंती देत असल्याचे मिंडाचे व्यवस्थापक उल्हास नेवाळे यांनी सांगितले. तीन शिफ्टपैकी एका शिफ्टच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रियेतील सातत्य टिकविण्यात या तरुण सहकारी कामगार मित्रांमुळे शक्य झाल्याची भावना नेवाळे यांनी व्यक्त केली.
जाफा या पशुखाद्य निर्मिती केंद्रावर पूर्ण क्षमतेने उत्पादन प्रक्रिया राबवली जात आहे. कारण मर्यादित मनुष्यबळाचा वापर, घेतलेल्या खबरदारीच्या उपाय योजनांमुळे ते शक्य होत असल्याचे व्यवस्थापक भागवत चव्हाण व एचआर नेमिनाथ सुतार यांनी सांगितले. आम इंडिया कारखान्यात ३५ टक्के उत्पादन सुरू आहे. आम इंडिया तुमच्या पाठीशी कामगारांच्या मागे खंबीरपणे उभी असल्याचे व्यवसथापक संदीप गोखले यांनी सांगितले.
ईपीटॉम या कारखान्यातील उपस्थितीवर परिणाम झाला असला तरी उत्पादन नियमितपणे सुरू असल्याचे कारखान्याचे संचालक अनुराग धूत यांनी सांगितले. पीजी इलेक्ट्रॉप्लास्टमध्येही उत्पादन प्रक्रिया सुरळीत ठेवताना थोडीशी घट आल्याचे व्यवस्थापक प्रवीण निंबाळकर यांनी सांगितले. कारखान्यातील कामगारांच्या लसीकरणाची नियोजन करताना अडचणी येत असल्याचे निंबाळकर यांचे म्हणणे आहे. तरुणांची मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
---
कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे भीतीचे वातावरण असले तरी यावेळी एमआयडीसीतील कारखान्यात काम करणारे कामगार गावाकडे न जाता येथेच थांबल्याने कारखाने बंद पडले नाहीत. उत्पादनावर परिणाम झाला असला तरी त्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात कामगारांची मोठी मदत झाली. कारखान्यांच्या अडचणी वाढल्या. त्यामुळे भविष्यात या अरिष्टातून बाहेर पडण्यासाठी मदतीची गरज लागणार आहे. संघटनेच्या माध्यमातून सुपा एमआयडीसीतील कारखान्यांसमोरील अडचणी सोडविण्यासाठी नक्कीच मदत केली जाईल.
-अनुराग धूत
अध्यक्ष, सुपा इंडस्ट्रियालिस्ट असोसिएशन
----
२६ सुपा एमआयडीसी
सुपा एमआयडीसीतील कारखान्यात काम करणारे तरुण कामगार सकाळीच बसमध्ये बसताना.