गोदावरी नदीपात्रात पेटविलेले डंपर बेवारस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 AM2021-05-29T04:16:50+5:302021-05-29T04:16:50+5:30
आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनांच्या मालकांचे नाव शोधण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. नायगाव येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली ...
आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनांच्या मालकांचे नाव शोधण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. नायगाव येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. शनिवारी (दि.२२) मध्यरात्री ग्रामस्थांनी येथे वाळूचे तीन डंपर पकडले होते. त्यानंतर पोलीस व महसूल प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली होती. तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांनी नियुक्त केलेले विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
यानंतर ही वाहने नदीपात्राबाहेर काढली जात असताना अचानकपणे अज्ञात लोकांनी दोन वाहनांचे टायर पेटविले होते. मात्र अंधारात हे कृत्य कोणी केले हे मात्र समजू शकले नाही. तालुका पोलीस ठाण्यात वाळू चोरीप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामस्थांनी या कृत्याचा इन्कार केला होता. मात्र वाळू चोरीमुळे त्रस्त झाल्याने त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.
दरम्यान, घटनेला आता आठ दिवस उलटून गेले आहेत. जळालेली दोन्ही वाहने पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या मालकांचा शोध लागलेला नाही. याबाबत तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. ते म्हणाले, वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी आरटीओ कार्यालयाला पत्र देण्यात आले आहे. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे तेथील कामकाज बंद आहे. त्यामुळे अद्यापही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याबाबत माहिती मिळताच पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
-----------