शनी अमावस्येनिमित्त शिंगणापुरात लाखो भाविक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 03:44 PM2019-01-05T15:44:48+5:302019-01-05T15:44:56+5:30
शनी अमावस्येनिमित्त आज शनी शिंगणापुरात शनिदेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत.
सोनई : शनी अमावस्येनिमित्त आज शनी शिंगणापुरात शनिदेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत.आज शनिवारी पहाटे ४ वाजून ५७ मिनिटांनी अमावस्येस सुरुवात झाली असून रविवारी सकाळी वाजून ५७ मिनिटांनी संपणार आहे. संपूर्ण दिवस अमावस्या असल्यामुळे दिवसभर भाविक दर्शनसाठी येणार आहेत. पहाटेची महाआरती औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आली.
दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. परिसरातील हॉटेल, पूजा साहित्याची दुकाने, स्टेशनरी दुकाने, खेळणीच्या दुकाणामुळे रस्ते फुलले होते. भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रेत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शासकीय व देवस्थानची यंत्रणा धावपळ करतांना दिसत होती. श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक रोहिदार पवार, शेवगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवाशाचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे, सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, शनिशिंगणापुरचे पोलिस निरीक्षक ललित पांडुळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.