दिवसभरात ४१ रुग्ण वाढले, संगमनेर तालुक्यातील कुरण गावात २२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 09:02 PM2020-07-05T21:02:08+5:302020-07-05T21:02:23+5:30
अहमदनगर : रविवारी दिवसभरात ४१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एकट्या कुरण गावात २२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता गावाची चिंता वाढली आहे. तर १५ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
अहमदनगर : रविवारी दिवसभरात ४१ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एकट्या कुरण गावात २२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता गावाची चिंता वाढली आहे. तर १५ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६१८ इतकी झाली आहे. रविवारी १७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा रुग्णालयात या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली होती. याशिवाय आणखी १२ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये नवनागापूर येथील तीन, नगर शहरातील पद्मानगर भागातील दोन, नाईकवाडपुरा (संगमनेर) येथील एक, श्रीरामपूर येथील एक, भिंगारमधील गवळीवाड्यातील दोन, खेरडा (ता. पाथर्डी) येथील दोन, राहाता येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
रात्री २८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामध्ये कुरण गावातील २२ जण, शेवगाव तालुक्यातील निंबे नांदुर येथील एक आणि श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावचे पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एका आमदाराच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असून दक्षता म्हणून त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दुपारपर्यंत ११० आणि सायंकाळी ६५ जण अशा १७५ जणांचे अहवाल दिवसभरात निगेटिव्ह आले आहेत.
रविवारी सकाळी १५ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४०० इतकी झाली आहे. रविवारी सोडण्यात आलेल्या १५ जणांमध्ये नगर शहरातील ९, नगर तालुक्यातील चार, संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाला घरी सोडण्यात आले.