भगवान गडावरील दसरा मेळावा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:21 PM2020-10-23T17:21:20+5:302020-10-23T17:21:44+5:30
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भगवानगडावरील दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोनावर लस निघेपर्यंत गडाचे महाद्वार खुले होणार नसल्याची माहिती गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दिली.
टाकळीमानूर : कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भगवानगडावरील दसरा मेळावा व सीमोल्लंघन सोहळा यावर्षी रद्द करण्यात आला आहे. कोरोनावर लस निघेपर्यंत गडाचे महाद्वार खुले होणार नसल्याची माहिती गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दिली.
भगवानगडाची स्थापना होऊन ६९ वर्ष झाली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गडाचे नाव भगवानगड ठेवले. दसरा मेळाव्याची भाविकांची परंपरा कधीही खंडित झाली नव्हती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक विशेषतः वंजारी बांधव मेळाव्याला आवर्जून येतात. समाधी पूजन, गुरूमंत्र, दीक्षा, शस्त्रपूजन व दर्शन सोहळा असे विधी होतात. येथे अहोरात्र महाप्रसाद वाटप केले जाते.
याबाबत महंत शात्री म्हणाले, गडावर अनेक विद्यार्थी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून एकही विद्यार्थी प्रवेशद्वाराबाहेर गेला नाही. गडावरील एकाही व्यक्तीला बाबांच्या कृपेने रोगाची बाधा झाली नाही.
भगवान गडावर दैनंदिन धार्मिक विधी नियमित सुरू असून भाविक महाद्वाराचे दर्शन घेऊन माघारी फिरतात. कुणालाही प्रवेश दिला जात नाही. गर्दीचा अंदाज पाहता दसरा मेळावा भाविकांना त्रासदायक होऊ नये यासाठी रद्द केला आहे, असे त्यांनी सांगितले.