नगरमधून बाहेर जाणा-या २२ हजार जणांचे ई-पास ‘रिजेक्ट’; अडीच हजार प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 11:58 AM2020-05-20T11:58:23+5:302020-05-20T11:59:10+5:30

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या मूळ ठिकाणी परतण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून गेल्या पंधरा दिवसात तब्बल ४० हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. मात्र कारण असमाधानकारक असल्याने त्यातील २२ हजारांहून अधिक ई-पास नाकारण्यात आले.

E-pass 'rejection' of 22,000 people leaving the city; Two and a half thousand pending | नगरमधून बाहेर जाणा-या २२ हजार जणांचे ई-पास ‘रिजेक्ट’; अडीच हजार प्रलंबित

नगरमधून बाहेर जाणा-या २२ हजार जणांचे ई-पास ‘रिजेक्ट’; अडीच हजार प्रलंबित

अहमदनगर : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या मूळ ठिकाणी परतण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून गेल्या पंधरा दिवसात तब्बल ४० हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. मात्र कारण असमाधानकारक असल्याने त्यातील २२ हजारांहून अधिक ई-पास नाकारण्यात आले. १६ हजार ४०० अर्ज मंजूर झाले, तर अद्याप अडीच हजार अर्ज प्रलंबित आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेक मजूर, पर्यटक, विद्यार्थी, भाविक इतर राज्यात, जिल्ह्यात अडकून पडले. त्यांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने १ मे पासून सवलत दिलेली आहे. मात्र त्यासाठी त्यांना ‘कोविड १९ डॉट एमएचपोलीस डॉट ईन’ या संकेतस्थळावर आॅनलाईन पाससाठी माहिती भरण्यास सांगण्यात आले आहे. नगर जिल्ह्यासाठी प्रथम हे काम पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू होते. परंतु नंतरच्या काही दिवसांत ते महसूलकडे आले व सध्या महसूल विभागामार्फतच सुरू आहे. 
उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार (कूळकायदा) शरद घोरपडे व त्यांचे पथक ई-पासची प्रक्रिया हाताळत आहेत. प्रारंभी अत्यावश्यक सेवेसाठी असणारे हे पास आता इतर कारणांसाठीही दिले जात आहेत. त्यातील अटी काहीशा शिथिल केल्या आहेत. परंतु तरीही अर्ज रिजेक्टचे प्रमाण अर्ज मंजुरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अनेकांना इच्छितस्थळी जाणे अवघड झाले आहे. 
ज्याला प्रवास करायचा आहे, त्याचा पासपोर्ट फोटो संकेतस्थळावर अपलोड करावा लागतो. या फोटोचा आकार २०० केबीपेक्षा जास्त नसावा असे म्हटले आहे. शिवाय वैद्यकीय प्रमाणपत्र व आधारकार्ड अशी कागदपत्रे जोडायची असून त्याचाही आकार ५०० केबीपेक्षा जास्त नसल्याचे म्हटले आहे. परंतु अनेकजण हा अर्ज मोबाईलवर भरतात. त्यामुळे या कागदपत्रांचा आकार कमी करता येत नाही. त्यामुळेही अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. 
का होतात अर्ज ‘रिजेक्ट’
या आॅनलाईन पाससाठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, प्रवासाचा कालावधी, प्रवासासाठीचे वाहन, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र, आधार कार्ड क्रमांक, फोटो आदी माहितीसह सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवासाचे कारण ही माहिती भरावी लागते. परंतु यातच अनेक अर्ज नाकारले जात आहेत. मूळात हा संपूर्ण अर्ज इंग्रजीत भरायचा आहे. त्यामुळे अनेकांना तो भरता येत नाही. प्रवासाचे कारण अनेकदा वैयक्तिक असे दिले जाते. त्यामुळे ते नाकारले जाते. प्रवास करणारे अनेक व वैद्यकीय अहवाल केवळ एकाचा असे झाल्यानेही अर्ज रिजेक्ट होत आहेत. 

नगर जिल्ह्यात दररोज सुमारे अडीच ते तीन हजार आॅनलाईन अर्ज प्राप्त होतात. त्या सर्वांचा निपटारा करण्याचा प्रयत्न असतो. याशिवाय अर्जाच्या चौकशीसाठी १०० हून अधिक कॉलही येतात. सर्वांची निकड लक्षात घेता अधिकाधिक अर्ज मंजुरीचा प्रयत्न केला जातो, असे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले. 
 

Web Title: E-pass 'rejection' of 22,000 people leaving the city; Two and a half thousand pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.