राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘मेमरी क्लिनिक’ सुरु
By साहेबराव नरसाळे | Published: September 21, 2018 11:54 AM2018-09-21T11:54:37+5:302018-09-21T11:54:41+5:30
स्मृतीभ्रंश आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आजपासून ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात येत आहेत.
साहेबराव नरसाळे
अहमदनगर : स्मृतीभ्रंश आजारावर उपचार करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आजपासून ‘मेमरी क्लिनिक’ सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे विसराळूपणावर आता शासकीय उपचार मिळणार आहेत.
केंद्र सरकारने १९८२ पासून देशभरात नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम सुरु केला़ त्यानुसार महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी येथे मनोरुग्णालये सुरु करण्यात आली. मात्र, जिल्हास्तरावर या आजाराचे निदान आणि उपचार करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे स्मृतीभं्रश आजाराचे प्रमाण वाढत होते. रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते किंवा वरील मनोरुग्णालयांमध्ये दाखल व्हावे लागत होते. त्यामुळे ७ जानेवारी रोजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह आरोग्य सहसंचालकांच्या झालेल्या बैठकीत राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेमरी क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जागतिक स्मृतीभ्रंश दिनाचे औचित्य साधून हे मेमरी क्लिनिक सुरु करण्यात येत आहेत. रुग्णांची प्राथमिक तपासणी करून आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व उपचार मोफत करण्यात येणार आहेत. तसेच त्यांना औषधेही जिल्हा रुग्णालयातून पुरविले जातील.
00 प्रत्येक मेमरी क्लिनिकमध्ये मनोविकार तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ, फिजिशीयन अशा तीन तज्ज्ञांचे पॅनल नियुक्त करण्यात आले आहे.
00 त्यांच्या मदतीसाठी मनोविकार परिचारिका, मनोविकार क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, आहारतज्ज्ञ असणार आहेत.
एडीआयने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये भारतात ४१ लाख लोक स्मृतीभ्रंश आजाराने ग्रस्त आहेत. मात्र, केवळ १० टक्के रुग्ण या आजारावर उपचार घेऊ शकतात. आता राज्यातील प्रत्येक जिल्हा पातळीवर मेमरी क्लिनिक सुरु झाल्यामुळे अशा रुग्णांना उपचार मिळणे सोपे होणार आहे. -डॉ. अशोक कराळे, मानसोपचार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर