नोटाबंदीतून जनतेची आर्थिक नसबंदी; राधाकृष्ण विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 05:33 PM2017-11-09T17:33:27+5:302017-11-09T17:43:35+5:30
मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटाबंदी केली. मात्र प्रत्यक्षात किती काळा पैसा बाहेर काढला. उलट मुठभर लोकांच्या काळ्या धनाचे पांढरे धन केले.
श्रीगोंदा : मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटाबंदी केली. मात्र प्रत्यक्षात किती काळा पैसा बाहेर काढला. उलट मुठभर लोकांच्या काळ्या धनाचे पांढरे धन केले. नोटाबंदीमुळे मात्र सामान्य नागरिकांची आर्थिक नसबंदी झाली, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी सेवा संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे होते. विखे म्हणाले, शासनाने शेतक-यांना ऐतिहासिक कर्जमाफीचे आमिष दाखवले, परंतु शेतक-यांना कर्जमाफीची खोटी प्रमाणपत्रे देऊन ऐतिहासिक फसवणूक केली. आता या सरकारला जनता ऐतिहासिक चपराक देणार आहे. आघाडीचे सरकार असताना नगर जिल्ह्यातील शेतक-यांना १ हजार १०० कोटीचे अनुदान देण्यात आले. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांना दुष्काळात २७ कोटी ठिंबकसाठी, ५ कोटी पीक विम्यापोटी, शेततळ्यासाठी ७ कोटीचे अनुदान दिले.
शिवाजीराव नागवडे म्हणाले, शासनाने वारेमाप करवाढ केली आहे. हे शासन सहकाराच्या तर हात धुवून मागे लागले आहे. या नादान सरकारचा समाचार घ्यावा लागणार आहे. अण्णासाहेब शेलार म्हणाले, भाजपाचे माझ्या मागे लागले. त्यांचा मुकाबला करण्यासाठी राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंद्यातील नेत्यांनी पुन्हा मूठ बांधण्याची गरज आहे.
भगवानराव पाचपुते, तुकाराम दरेकर, दिनेश इथापे, सरस्वती डाके यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, जि.प.च्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, विश्वास थोरात, हरिदास शिर्के, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब गिरमकर, प्रशांत दरेकर, अमृत पितळे, धना पाटील, संजय जामदार, अर्चना गोरे उपस्थित होते.
भाषणे ऐकून अंगावर काटा
श्रीगोंद्यात भाषणे करणारांची संख्या वाढली आहे. ही भाषणे ऐकून अंगावर काटा येतो. तुम्ही भाषणे कमी करा. आपण अण्णासाहेब शेलार यांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. आम्ही शेलार यांना ताकद देणार आहे. कामाचा वेग वाढवा, भविष्यकाळ तुमचाच राहणार आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
(फोटो-०९ श्रीगोंदा, विखे)