ईडी, सीबीआय राजकारणाची नवी स्टाईल : सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 03:26 PM2019-08-23T15:26:05+5:302019-08-23T15:27:36+5:30
यापूर्वी कधी ईडी, सीबीआयची नावे कधी ऐकली नव्हती. भाजप सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले आहेत.
अहमदनगर : यापूर्वी कधी ईडी, सीबीआयची नावे कधी ऐकली नव्हती. भाजप सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून हे प्रकार सुरू झाले आहेत. नेत्यांना नोटिसा देण्याचे जणू वारच ठरले आहेत. ईडी व सीबीआय ही नवी संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात रुजविजली जात आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगर येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुसंवाद यात्रेनिमित्त आज खासदार सुप्रिया सुळे नगर दौ-यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ त्यावेळी त्या बोलत होत्या.
भाजप सरकारकडून ईडी व सीबीआयचा गैरवापर सुरू आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे़ गेल्या सहा वर्षात त्यांना घोटाळे दिसले नाही का ? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दडपशाहीचे राजकारण भाजप सरकारने सुरू केले आहे़ विरोधात बोलणा-यांच्या घरी नोटिसा धाडल्या जात आहेत़ सरकारकडे बहुमत आहे, तर मग भिती कशाची वाटते़ काँग्रेस आघाडीही १५ वर्षे सत्तेत होती़ पण, अशी वैयक्तिक कटुता कधी आली नाही, असेही सुळे म्हणाल्या.