शिक्षणतज्ज्ञ सर्जेराव निमसे म्हणतात...परीक्षा न झाल्यास महाराष्ट्राची नाचक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:24 AM2020-06-05T11:24:14+5:302020-06-05T11:25:09+5:30
अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता पदवी देणे अशैक्षणिक असून विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. देशाच्या इतर भागात परीक्षा होत असताना महाराष्ट्रात त्या न होणे ही राज्याची नाचक्की ठरेल. या प्रकारामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर हिणवले जाईल. त्यामुळे वेळ जरी लागला तरी परीक्षा घेऊनच पदवी दिली गेली पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले.
अहमदनगर : अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता पदवी देणे अशैक्षणिक असून विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. देशाच्या इतर भागात परीक्षा होत असताना महाराष्ट्रात त्या न होणे ही राज्याची नाचक्की ठरेल. या प्रकारामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर हिणवले जाईल. त्यामुळे वेळ जरी लागला तरी परीक्षा घेऊनच पदवी दिली गेली पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर डॉ. निमसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. कोणत्याही शाखेच्या अंतिम परीक्षांना वेगळे महत्व असते. सध्या विद्यापीठ पातळीवर परीक्षांची सर्व तयारी झालेली आहे. विद्यापीठांनी त्यावर खर्चही केलेला आहे. विद्यार्थी तयार आहेत, पालकांची हरकत नाही, मग शासन परीक्षांना नकारघंटा का देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी ही घेतलीच पाहिजे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये.
परीक्षा न घेता दिलेली ‘उसणी’ पदवी घेऊन आपला विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोणत्या तोंडाने मिरवणार? राष्ट्रीय पातळीवर तो इतर ठिकाणी पुढील शिक्षण घेण्यासाठी गेला तर त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्याचे मनोबल खचेल. शिवाय करिअरच्या दृष्टीनेही त्याला याचा फटका बसणार आहे.
केवळ अंतिम सत्राचीच परीक्षा घ्यायची असल्याने तसेही विद्यार्थी कमीच आहेत. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार आहे. महाविद्यालयांकडे स्टाफ मुबलक आहे. विद्यार्थी व पालकांची तयारी आहे. त्यामुळे शासनाने परीक्षा घेणेच संयुक्तिक ठरेल, असे मत डॉ. निमसे यांनी व्यक्त केले.