शैक्षणिक संस्थांनी अडवली डी.एड. शिक्षकांची पदोन्नती; शिक्षक भरतीपूर्वी विचार होण्याची मागणी
By चंद्रकांत शेळके | Published: July 31, 2023 11:34 PM2023-07-31T23:34:25+5:302023-07-31T23:35:14+5:30
नवीन शिक्षक भरतीत आधी या शिक्षकांना पदोन्नती द्यावी, मगच इतर रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी या शिक्षकांमधून होत आहे.
अहमदनगर : राज्यातील विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये बी.एड. असूनही डी.एड. वेतनश्रेणीत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना केवळ संस्थांच्या वेळकाढूपणामुळे पदोन्नतीपासून दूर राहावे लागत आहे. राज्यात असे हजारो शिक्षक असून, गेल्या २५ वर्षांपासून ते जुन्याच वेतनश्रेणीवर काम करीत आहेत. नवीन शिक्षक भरतीत आधी या शिक्षकांना पदोन्नती द्यावी, मगच इतर रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी या शिक्षकांमधून होत आहे.
महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये सेवाज्येष्ठतेचा हक्क डावलून पदोन्नती दिल्याचे प्रकार होत आहेत किंवा अनेक ठिकाणी रिक्त जागा असूनही पदोन्नतीसाठी संस्थांनी पाठपुरावा केलेला दिसत नाही. पूर्वी अनेक खासगी अनुदानित माध्यमिक शाळांतील रिक्त जागांवर बी.एड. झालेले शिक्षक डी.एड.च्या वेतनश्रेणीवर नियुक्त झालेले आहेत. नियमानुसार त्यांना जागा रिक्त झाल्यानंतर पदोन्नती व बी.एड.ची वेतनश्रेणी देणे गरजेचे होते. परंतु, शैक्षणिक संस्थांनी आपल्या फायद्यासाठी या पदोन्नत्या केल्या नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
मुळात अनेक संस्थांनी बी.एड. रिक्त पदावर सध्या संस्थेत डी.एड. वेतनश्रेणीवर कार्यरत असलेल्या आणि बी.एड. अर्हता प्राप्त करणाऱ्या शिक्षकास संधी देण्याऐवजी नव्याने बी.एड. शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. त्यामुळे डी.एड. वेतनश्रेणीत असलेले; परंतु बी.एड. अर्हताधारक शिक्षक ‘क’ संवर्ग यादीत स्थान न मिळाल्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीपासून वंचित राहिलेले आहेत. अशा शिक्षकांना संबंधित संस्थांनी नियमानुसार सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, असे निर्देश २०१९ मध्ये न्यायालयाने दिले आहेत. शिवाय तसा शासन निर्णयही आहे; परंतु याचे संस्थांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याने शिक्षकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
सध्या डी.एड. वेतनश्रेणीवर काम करणाऱ्या; परंतु बी.एड. अर्हता असलेल्या शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळावी. शिवाय हा निर्णय नवीन शिक्षक भरती होण्याआधी व्हावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षणमंत्र्यांकडे केलेली आहे. त्याचा विचार व्हावा. यातून राज्यभर हजारो शिक्षकांना न्याय मिळेल.
- सुनील गाडगे, राज्य सचिव, शिक्षक भारती संघटना
शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत संबंधित शैक्षणिक संस्थेने सेवाज्येष्ठतेनुसार प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविणे आवश्यक असते. याबाबत प्रस्ताव आलेल्या पात्र शिक्षकांची पदोन्नती झालेली आहे. इतर कोणी पात्र असतील तर त्यांच्या संस्थांनी प्रस्ताव पाठवावेत.
- अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
काय आहे शासन निर्णय?
संबंधित शिक्षक एच.एस.सी./बी.ए.,डी.एड. वेतनश्रेणीत कार्यरत असला आणि तो ज्या दिवशी प्रशिक्षित पदवीधर अर्हता (बी.ए.,बी.एड.) धारण करेल त्या दिवशी तो ‘क’ संवर्ग सेवाज्येष्ठता यादीत स्थान मिळवून सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरणार असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने २०१९ दिला असून या निर्णयाला अनुसरून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर केला आहे.