जमावबंदी, संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:27+5:302021-04-10T04:21:27+5:30
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी ...
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शुक्रवारी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्या वेळी त्यांनी हे निर्देश दिले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उदय किसवे, डॉ. अजित थोरबोले, जयश्री माळी, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, उज्ज्वला गाडेकर, पल्लवी निर्मळ, किशोर पवार, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदी या वेळी उपस्थित होते.
रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणीही चाचण्यांची संख्या वाढवावी. कन्टेन्मेंट झोन भागात आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वे करून कोरोना चाचण्या केल्या जाव्यात. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी आता नियोजनपूर्वक गतिमान कार्यवाही करावी. प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली करून आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचे नियोजन करून संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेऊन त्या वाढवाव्यात. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. अधिकाधिक प्रमाणात कोविड केअर सेंटर कार्यान्वित करून बाधित व्यक्तींना तेथे उपचारासाठी दाखल करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासगी रुग्णालयात विनाकारण ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर बेड्स रुग्णांनी अडवल्या गेल्या नाहीत ना हे तपासण्याची सूचना त्यांनी केली. एखाद्या रुग्णाला गरज नसेल तर ‘स्टेप डाऊन’ याप्रमाणे त्याला कोविड केअर सेंटर अथवा इतरत्र शिफ्ट करून दुसऱ्या रुग्णाला ते बेड्स उपलब्ध करून दिले पाहिजेत. याशिवाय, जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यासंदर्भात रुग्णाच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. याशिवाय, त्यासंदर्भात काही तक्रारी येत आहेत. यापुढील काळात खासगी डीसीएचसी यांना रेमडेसिवीर दिल्यानंतर तो साठा संपल्यानंतर रिकाम्या व्हाल्व्हज परत केल्यानंतरच नवीन साठा उपलब्ध करून दिला जाईल. महानगरपालिकेनेही त्यांचे पथक या रुग्णालयांमध्ये ठेवावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले आहेत.