वांग्याचे भाव गडगडले; शेतकरी आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:21 AM2021-05-12T04:21:36+5:302021-05-12T04:21:36+5:30
उन्हाळ्यात वांगे या पिकाला चांगला भाव मिळतो. या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी नाईकवाडी यांनी ३२ ...
उन्हाळ्यात वांगे या पिकाला चांगला भाव मिळतो. या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी नाईकवाडी यांनी ३२ गुंठ्यांमध्ये मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनचा वापर करत वांगे पिकाची लागवड केली. कीटकनाशक फवारणी व लागवड याकरता त्यांना ६० ते ६५ हजार रुपये खर्च आला. फळधारणा होऊन वांगे बाजारात विक्रीसाठी नेण्याची वेळ आली. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. तसेच वांग्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मॉल, बाजारपेठा, लग्नसोहळे व अन्य अन्य छोटे-मोठे सोहळे बंद असल्याने वांग्यांची मागणी घटून दर कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे अखेर नाईकवाडी हे जनावरांना वांगी खाऊ घालत आहेत.
-----------------
वांग्याला किमान १५ ते २० रुपये दर मिळायला हवा; परंतु प्रत्यक्षात १० रुपयांपेक्षाही कमी दर मिळत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. मजुरी आणि बाजारात विक्रीसाठी नेताना गाडीभाडेही सुटत नसल्याने वांगी जनावरांना टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
-शिवाजी नाईकवाडी, शेतकरी, घारगाव. ता. संगमनेर