राजूरमध्ये आठ दिवसांचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:44+5:302021-04-17T04:19:44+5:30
राजूर : राजूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ही शृंखला तोडण्यासाठी राजूर येथील व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उद्या ...
राजूर : राजूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ही शृंखला तोडण्यासाठी राजूर येथील व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उद्या शनिवारपासून आठ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत.
या सेवेत किराणा, भाजीपाला, कृषी, बँकिंग, दवाखाना, आदी बाबींचा समावेश होतो. त्यामुळे राजूरमध्ये रोजच गर्दी होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजूर आणि परिसरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ रोखण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच गणपत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजनांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, तलाठी ज्ञानेश्वर बांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रामनाथ दिघे, डॉ. शेळके, व्यापारी असोसिएशनचे श्रीराम पन्हाळे, संतोष चांडोले, सुधीर ओहरा, ग्रामपंचायत सदस्य, देविदास शेलार उपस्थित होते. या बैठकीत राजूरमधील सर्व नागरिकांनी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला. त्यामुळे राजूरची बाजारपेठ उद्या शनिवार ते पुढील आठवड्यातील शनिवारपर्यंत आठ दिवस बंद राहणार आहे. ग्रामपंचायत सदस्य भास्कर एलमामे यांनी सूत्रसंचालन करत उपस्थितांचे आभार मानले.
..................
६५ हजारांची मदत
राजूरमध्ये सुरू करण्यात आलेल्या १०० बेडच्या कोविड सेंटरसाठी आर्थिक व इतर स्वरूपात मदतीचे आवाहन करताच काहीवेळात उपस्थित असलेल्या स्थानिकांनी व काही अधिकाऱ्यांनी रोख ६५ हजार रुपये जमा केले. काही व्यापाऱ्यांनी धान्य स्वरूपात मदत जाहीर केली तर भाजीपाला व्यावसायिकांनी या कोविड सेंटरसाठी लागणारा भाजीपाला आपण पुरवणार असल्याचे सांगितले.