हद्दपार असणा-यांचा नगर शहरात वावर : नगरसेवकासह आठ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 04:38 PM2018-09-15T16:38:34+5:302018-09-15T16:39:01+5:30
गणेशोत्सव व मोहरम काळात हद्दीपारीची कारवाई झालेली असतानाही नगर शहरात वावरणा-या नगरसेवकासह आठ जणांना शनिवारी पोलीसांनी अटक केली़.
अहमदनगर: गणेशोत्सव व मोहरम काळात हद्दीपारीची कारवाई झालेली असतानाही नगर शहरात वावरणा-या नगरसेवकासह आठ जणांना शनिवारी पोलीसांनी अटक केली़.पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ३०० जणांवर पोलीसांच्या शिफारशीनुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी १२ ते २५ सप्टेंबरपर्यंत हद्दपारीची कारवाई केलेली आहे. ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना या काळात नगर शहरात राहता येणार नाही. कारवाई झाल्यानंतरही अनेक जण नगर शहरातच वावरत असल्याचे निदर्शनास अल्यानंतर पोलीसांनी कारवाई केली. यामध्ये नगरसेवक अरिफ रफीउद्दीन शेख यांच्यासह गणेश प्रकाश वाळके, नंदू लक्ष्मण बोराटे, परेश उर्फ परशूराम चंद्रकांत खराडे, शेख समीर ख्वाजा, युवराज नाना सपकाळ, सनी शंकर निकाळजे यांना अटक करून त्यांंच्यावर कलम १८८ प्रमाणे कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई होताच अनेक जण गायब
प्रतिबंधक कारवाईनंतरही शहरात वावरणा-यांची पोलीसांनी शुक्रवारी धरपकड सुरू केल्याने कारवाई झालेले अनेक जण शहराबाहेर निघून गेले आहेत. हद्दपारीचे आदेश दिलेल्या ३०० पैकी बहुतांशी जण शहरात राहून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत होते. शहरबंदीची कारवाई झालेले शहरात आढळून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मिटके यांनी दिला आहे.