श्रीगोंद्यातील आठ युवक झाले पीएसआय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:38 AM2018-06-21T11:38:56+5:302018-06-21T11:39:15+5:30
बाळासाहेब काकडे श्रीगोंदा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पीएसआय परिक्षेत श्रीगोंदा तालुक्यातील आठ युवकांनी यशाचा झेंडा फडकविला. यामध्ये एका ...
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पीएसआय परिक्षेत श्रीगोंदा तालुक्यातील आठ युवकांनी यशाचा झेंडा फडकविला. यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील मिलिंद माणिक चव्हाण (रा. वडाळी) या युवकाचा बालवयात विवाह झाला असतानाही त्याने पीएसआय होण्याचा बहुमान मिळविला आहे.
मिलिंद चव्हाण बरोबर प्रेमकुमार दांडेकर, आप्पासाहेब हंडाळ, मोहीत मोरे, राणी डफळ, आदिनाथ भडके, गणेश देशमुख, सागर देवकर या मुलांनी यश संपादन केले आहे
विवाहानंतर पीएसआय
मिलिंद चव्हाण याने सन २००९ मध्ये दहावीची परीक्षा दिली. त्याचवेळी त्याचा बेलवंडी येथील पारधी समाजातील शारदा हिच्याशी बालविवाह झाला. या दाम्पत्यास एक मुलगी, एक मुलगाही आहे. लग्नानंतर बारावीपर्यंत शिक्षण छत्रपती शिवाजी महाविद्यालयात घेतले. कॉलेजचे शिक्षण बंद झाले पण मिलिंद स्वस्त बसला नाही. अनंत झेंडे यांच्याशी चर्चा करून त्याने मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. सन २०१५मध्ये बी. ए. ची पदवी संपादन केली. श्रीगोंदा येथील महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्थेच्या परिक्षा केंद्रात अभ्यास सुरू केला. २०१६ मध्ये एम.पी. एस.सीची पीएसआयसाठीची परिक्षा दिली. पहिल्याच परिक्षेत मिलिंदने यश संपादन केले. त्यासाठी आई, वडील आणि पत्नीने साथ दिली.
मिलिंद म्हणाला, ‘‘बालपणी विवाह झाला. पहिली मुलगी झाली ती अपंग . चार महिन्यापुर्वी तिचे निधन झाले, मी खुप दु:खी झालो. पीएसआय झाल्याने या दुखातून बाहेर पडलो. मला आई वडील यांच्याबरोबर अनंत झेंडे यांचे मार्गदर्शन लाभले. पोलिस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न आहे’’
प्रेमकुमारची झुंज
श्रीगोंदा येथील भुमीहीन शेतमजुरांचा मुलगा प्रेमकुमार लहू दांडेकर. वडीलांचे २०११ अपघाती निधन झाले. आईने मोलमुजरी करून प्रेमकुमारला पदवीधर केले . प्रेमकुमार ने महादजी शिंदे महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असताना आडतीवर पावत्या फाडण्याचे काम सुरू केले. सन २०१५ बीए झाला. बाबा आमटे विकास सेवा संस्थेच्या परिक्षा केंद्रात अभ्यास करून प्रेमकुमारने बाजी मारली. प्रेमकुमार म्हणाला ‘‘सायकलवर प्रवास करणारा मुलगा आह.े खाकी वर्दीच्या माध्यमातून सामान्य माणसांना न्याय मिळून देण्यासाठी काम करणार आहे’’
मेंढपाळ करणारे हंडाळ बंधू फौजदार
कोकणगाव येथील धनगर समाजातील चांगदेव व आप्पासाहेब हंडाळ या बंधुनी मेंढ्या वळून परिक्षा दिली. दोघे बंधू पीएसआय झाले. आप्पासाहेब म्हणाले ‘‘हे श्रमाचे फळ आहे. मी पोलिस उपअधीक्षक परिक्षा देणार आहे. त्यामध्ये निश्चय यश येईल असा विश्वास आहे’’