शेतकरीपुत्राच्या उपोषणाचा आठवा दिवस, प्रशासन घेईना दखल
By चंद्रकांत शेळके | Published: October 18, 2023 09:01 PM2023-10-18T21:01:25+5:302023-10-18T21:01:43+5:30
आठ दिवसांपासून उपोषण सुरू
चंद्रकांत शेळके, अहमदनगर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी दिवसा किमान १० तास मोफत अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा, नोकऱ्यांचे खासगीकरण व सरकारी शाळांचे व्यापारीकरण हे निर्णय मागे घेण्यात यावेत, नोकरभरतीसाठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे १ हजार रुपये परीक्षा शुल्क रद्द करण्यात यावे आदी मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकरीपूत्र बाळासाहेब कोळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आठ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून अद्याप प्रशासन किंवा शासनाने त्यांची दखल घेतलेली नाही.
कोळसे पाटील (आडगाव, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात म्हटले आहे की, आपण शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र व दिल्लीपर्यंत सायकल प्रवास केला आहे. परंतु मागण्यांची कोणीही दखल घेतली नसल्याने १२ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आठवा दिवस असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्न निरुपयोगी ठरताना दिसत आहेत.
कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना मोफत पाणी व मोफत वीज पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे किमान १० तास दिवसा मोफत अखंडीत वीज पुरवठा करण्यात यावा.
नोकऱ्यांचे खासकीकरण व कंत्राटीकरण, तसेच सरकारी शाळांचे व्यापारीकरण हा अन्याकारक निर्णय असल्याने सरकारने तो मागे घेतला पाहिजे. राज्यात तबल १० वर्षांनंतर तलाठी, जिल्हा परिषद, वन विभाग, जलसंपदा, आरोग्य विभाग अशा विविध विभागात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु यासाठी घेतले जाणारे १ हजार रुपये परीक्षा शुल्क अवाजवी असून ते रद्द करावे, या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे.