साडेचारशे जणांना निवडणूक बंदी : वेळेत खर्च सादर न केल्याने फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:21 PM2018-10-03T17:21:38+5:302018-10-03T17:23:09+5:30
गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला.
अहमदनगर : गेल्या वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक खर्च वेळेत सादर न केलेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला. त्यामुळे ४५१ उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक बंदी असणार आहे.
गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया २०७ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका ५ आॅक्टोबर २०१७ रोजी झाल्या. ९ आॅक्टोबरला निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. निवडणूक लढविणाºया सर्वच उमेदवारांना निकालानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबर २०१७पर्यंत निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे अपेक्षित आहे. मात्र निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४८४ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना नोटिसा पाठवून म्हणणे मागवण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासमोर जुलै २०१८मध्ये यावर दोन दिवस सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत ३३ जणांनी निवडणूक खर्चाचा समाधानकारक खुलासा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. मात्र उर्वरित ४५१ उमेदवारांनी समाधानकारक खुलासा न केल्याने अखेर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी त्यांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अनेक दिग्गजांची अडचण झाली आहे.
दरम्यान, या उमेदवारांना जिल्हाधिका-यांच्या या अपात्र आदेशाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची संधी असल्याने तेथे त्यांना दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे.