सुजय विखेंचं नाव संग्राम जगतापांच्या वर; पाहा कसा ठरतो EVM वरचा क्रम!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 12:01 PM2019-04-10T12:01:24+5:302019-04-10T17:36:45+5:30
‘नावात काय आहे?’ असं जगविख्यात लेखक शेक्सपिअरने म्हटलेलं आहे. खरंच नावात काय असतं आणि त्याचे महत्त्व कधी, कुठे अधोरेखित होईल, याची अनुभूती सध्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना येत आहे.
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : ‘नावात काय आहे?’ असं जगविख्यात लेखक शेक्सपिअरने म्हटलेलं आहे. खरंच नावात काय असतं आणि त्याचे महत्त्व कधी, कुठे अधोरेखित होईल, याची अनुभूती सध्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना येत आहे.
सोमवारी अहमदनगर मतदारसंघ निवडणूक रिंगणातील उमेदवार अंतिम झाले आणि मतदानावेळी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर असणारा उमेदवारांचा क्रम समोर आला. त्यात बसपाचे नामदेव वाकळे प्रथम, भाजपचे सुजय विखे दुसऱ्या तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर राज्यस्तरीय पक्ष व शेवटी अपक्ष असा हा क्रम पुढे जातो. मुळात मतदान यंत्रावरील उमेदवारांचा क्रम ठरतो कसा, त्यात सर्वांत वर कोण, सर्वात खाली कोण अशी चर्चा सुरू झाली. निवडणूक शाखेकडे विचारणा केली असता, त्यांनी या नावांच्या क्रमाचे सूत्र ‘लोकमत’शी बोलताना विशद केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी २००९ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदान यंत्रावरील उमेदवारांच्या नावाचा क्रम ठरविला गेलेला आहे.
या प्रक्रियेत प्रथम पक्षांचा क्रम ठरवला जातो, त्यानंतर उमेदवारांच्या नावांचा विचार होतो. प्रथम मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर नोंदणी झालेला, मात्र मान्यता नसलेला पक्ष व शेवटी अपक्ष अशी ही यादी झाल्यानंतर मग उमेदवारांची नावे अल्फाबेटप्रमाणे घेतली जातात.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्या त्या राज्याची राजभाषा निवडणुकीचे माध्यम म्हणून वापरतात. महाराष्ट्रात सर्व मतदारसंघांत निवडणुकीचे कामकाज मराठीतच चालते. त्यामुळे ईव्हीएमवर उमेदवारांची नावेही मराठी वर्णमालेनुसार ठरवून हा क्रम अंतिम केला जातो.
‘सु’.... नंतर ‘सं....’
भाजपचे सुजय विखे व राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यातील अहमदनगर मतदारसंघाची लढत देशात लक्षवेधी ठरली आहे. दोन तुल्यबळ उमेदवारांत होणारी ही निवडणूक आपापल्या पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे संग्राम-सुजय यांच्यात कोण बाजी मारणार? अशा पैजाच मतदारांत सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मतदान यंत्रावर उमेदवारांच्या नावांचा क्रम लक्षात घेता येथे सुजय व संग्राम यापैकी कोणाचे नाव अगोदर येणार हा प्रश्न होता. या मतदारसंघात बसपा, भाजप व राष्ट्रवादी हे तीन राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांच्या उमेदवारांना वरची पसंती देण्यात आली आहे. यातही मराठी वर्णमालेनुसार बसपाचे नामदेव वाकळे प्रथम आहेत. त्यानंतर सुजय व संग्राम यांची नावे आहेत. दोघांचे ‘स’ हे वर्ण समान येतात. परंतु वर्णमालेनुसार उकार हा अनुस्वाराच्या आधी येतो. त्यामुळे ईव्हीएमवर ‘सु’जय हे नाव ‘सं’ग्राम यांच्या आधी आलेले आहे.