आरं..आले... खासदार आपले!
By Admin | Published: September 4, 2015 12:11 AM2015-09-04T00:11:13+5:302015-09-04T00:13:22+5:30
श्रीरामपूर : कुंभमेळा सुरू होऊन पहिलं शाही स्नान उरकल्यानंतरसुद्धा शोधूनही न सापडणारे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मुंबई निवासी खासदार सदाशिव लोखंडे एकदाचे मतदारसंघात प्रकटले.
श्रीरामपूर : कुंभमेळा सुरू होऊन पहिलं शाही स्नान उरकल्यानंतरसुद्धा शोधूनही न सापडणारे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे मुंबई निवासी खासदार सदाशिव लोखंडे एकदाचे मतदारसंघात प्रकटले. त्यामुळे ‘आरं..आले.. खासदार आपले!’अशी चर्चा मतदारांत होत आहे.
रामनवमी २८ मार्चला झाली. तेव्हा श्रीरामपूरकरांनी राम मंदिराजवळ खासदार पाहिले. त्यानंतर २२ मे रोजी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीलाही ते हजर नव्हते. मात्र ही बैठक सुरू असतानाच घाईघाईत उशिराने श्रीरामपूरच्या सरकारी विश्रामगृहात तहसीलदार, बी.डी.ओ.ना बोलावून त्यांनी त्यांच्यासह घाईगडबडीत स्वत: सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवडलेल्या मालुंजा गावात विशेष ग्रामसभा घेतली.
श्रीरामपूरमध्ये येऊनही टंचाई आढावा बैठकीकडे ढुंकूनही न पाहता ते परतले. मे, जून, जुलै हे पावसाळी महिने कोरडेठाक जाऊन नेहमी हिरवागार असणारा श्रीरामपूर तालुकाही पाणीटंचाईने दुष्काळी छायेत गेला. या छायेतही खासदारांची छाया दिसली नाही. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शिर्डी लोकसभा मतदारसंघात भेडसावत असताना टंचाई आढावा बैठका घेऊन सरकारी यंत्रणा कामाला लावायलाही खासदार मतदारसंघात फिरकले नाहीत. अखेर त्या त्या तालुक्याच्या आमदारांनी उशिरा का होईना बैठका घेऊन मतदारसंघातील पाण्याचा शोध घेतला. संसदेचं अधिवेशन विरोधकांच्या गोंधळात वाहून गेलं तरी खासदारांना मतदारसंघात यायला सवड मिळाली नाही. त्यामुळे गावोगाव स्वपक्षीयांपासून विरोधकांपर्यंत साऱ्यांनीच खासदारांच्या गैरहजेरीविषयी ओरड केली. टाकळीमियाँ (ता. राहुरी) येथील भाजपाचे गणप्रमुख राजेंद्र करपे यांनी तर ‘खासदार दाखवा, बक्षीस मिळवा’, असा युतीच्या खासदाराला घरचा आहेर दिला. नेवासा तालुक्यातही एका गावाने ग्रामसभेत निवडून गेल्यापासून खासदार फिरकले नसल्याने त्यांच्या निषेधाचा ठराव केला. खासदारांचा शोध घेत जनक्षोभ वाढू लागल्यानंतर आता कुठे खासदार शिर्डीत पोहोचले. कोपरगावच्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्यानंतर ते कोपरगावातही दिसले. त्यामुळे मतदारांसह युतीच्या कार्यकर्त्यांनाही हायसे वाटल्याचे म्हटले जात आहे. (प्रतिनिधी)