नगर तालुक्यात आता सेवा संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:18+5:302021-01-23T04:20:18+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्या पाठोपाठ आता तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या ...
केडगाव : नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्या पाठोपाठ आता तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. तालुक्यातील मांडवे, निंबोडी व बाबुर्डी घुमट सोसायटीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून शुक्रवारी सारोळा कासार व बाबुर्डी बेंद या सेवा संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवत उच्च न्यायालयात गेलेल्या जिल्हा सहकारी बँकेसह तीन कारखाने व १८ सेवा संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया ज्या ठिकाणी थांबलेली होती तेथून पुढे सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ४ जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे.
यामध्ये नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट, मांडवे, बाबुर्डी बेंद, वाळुंज, दशमी गव्हाण, सारोळाकासार, मल्हार निंबोडी या ७ सेवा संस्थांचा समावेश आहे. यातील दशमीगव्हाण सेवा संस्था निवडणूक बिनविरोध झाली आहे. बाबुर्डी घुमट, मांडवे, मल्हार दळवी या तीन सेवा संस्थांच्या अंतिम मतदार याद्या १४ जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या आहेत. या तीन संस्थांचा निवडणूक कार्यक्रम २८ किंवा २९ जानेवारीला जाहीर होणार आहे.
शुक्रवारी जिल्ह्यातील ४ सेवा संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून त्यामध्ये नगर तालुक्यातील सारोळा कासार व बाबुर्डी बेंद या दोन तर श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी, सुरेगाव या संस्थांचा समावेश आहे. प्रारूप मतदार याद्यांवर हरकतीसाठी १ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. आलेल्या हरकतींवर सुनावणी होऊन ११ फेब्रुवारीला निर्णय देण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.
----
अक्रियाशील सभासदांना मतदानाचा हक्क देण्याची मागणी फेटाळली
मांडवे, बाबुर्डी घुमट व निंबोडी सोसायट्यांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यापूर्वी अक्रियाशील सभासदांना मतदानाचा हक्क देण्याबाबतच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र या मागण्या जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे जे क्रियाशील सभासद आहेत, त्यांनाच मतदानाचा हक्क राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.