मतदारयादीत चक्क महाराष्ट्र, हिंदू नावाच्या मतदारांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:25 AM2019-04-22T05:25:54+5:302019-04-22T05:26:23+5:30

शासनाच्या संकेतस्थळावर सापडली नावे

In the electoral roll, the records of very few voters named Maharashtra, Hindu | मतदारयादीत चक्क महाराष्ट्र, हिंदू नावाच्या मतदारांची नोंद

मतदारयादीत चक्क महाराष्ट्र, हिंदू नावाच्या मतदारांची नोंद

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये ‘महाराष्ट्र महाराष्ट्र’, ‘हिंदू’ अशा नावांचेही मतदार आढळून आले आहेत. राहुरी, अहमदनगर, पारनेर अशा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत ही नावे आढळून आली आहेत. या मतदारांनी कुठे मतदान करावे, याचे केंद्रही निश्चित करण्यात आली आहेत. मतदार यादीत बोगस नावे आढळून आली असली तरी ओळखपत्राशिवाय मतदान करू देणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी या संकेतस्थळावर आपले मतदान कुठे आहे? हे शोधता येते. नगरमधील एका केंद्रावर मतदारांची नावे शोधताना हा प्रकार आढळून आला. लोकमतने त्याची खात्री केली असता महाराष्ट्र महाराष्ट्र, हिंदू अशी नावे असलेले मतदार असल्याचे आढळून आले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या यादीत शिर्डी लोकसभा मतदार संघातील तब्बल चार ते पाच हजार नावे आहेत. एकच नाव दोन-दोन लोकसभा मतदारसंघात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. मतदार नोंदणीचा कार्यक्रम घरबसल्या आॅनलाईनद्वारे करण्याची सोय आहे. तसेच ग्रामीण भागात मतदार नोंदणीची कामे आऊटसोर्सिंगद्वारे केली जातात.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झालेली आहे. त्यामध्ये अशी बोगस नावे असतील तर तीही अंतिम यादीतच समाविष्ट होतात. मतदार यादीत अशी नावे असली तरी ओळखपत्र दाखविल्याशिवाय कोणालाही मतदान करता येणार नाही. पुन्हा यादी अपडेट होईल, त्यावेळी ही नावे वगळली जातील.
- प्रशांत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर

Web Title: In the electoral roll, the records of very few voters named Maharashtra, Hindu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.