वीजपंप, दुचाकी चोरास पकडून ग्रामस्थांकडून चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:20 AM2021-03-19T04:20:12+5:302021-03-19T04:20:12+5:30
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील देसवडे गावानजीक बुधवारी सायंकाळी गोविंद कानडे यांच्या मकाच्या शेतात चोरीची दुचाकी आणून लपून बसलेल्या ...
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील देसवडे गावानजीक बुधवारी सायंकाळी गोविंद कानडे यांच्या मकाच्या शेतात चोरीची दुचाकी आणून लपून बसलेल्या संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील एका चोरट्याला पकडून ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. त्याचे इतर तीन साथीदार ग्रामस्थांना पाहून फरार झाले. सहाय्यक फौजदार शिवाजी नानाभाऊ कडूस यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ते तिघेही दुचाकी, वीजपंप चोरी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेतील एक चोर संगमनेर तालुक्यातील रहिवासी असून इतर तिघे पारनेर तालुक्यातील वारणवाडी गावातील पारदरा (ठाकूरवाडी) येथील रहिवासी असल्याचे समजते. देसवडे गावातील संगीता संजीव भोर व रामा गुंड या दोघांनी मोटारसायकल घेऊन पळून जाणाऱ्या चोराला मोठ्या शिताफीने पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
या दुचाकी व वीजपंप चोरी प्रकरणी पोपट नाथू भुतांबरे (रा. शिंदेवाडी, ता. संगमनेर) असे ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेल्याचे नाव आहे. परिसरात वीजपंप, दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी व्यक्त केली आहे. इतर तीन चोरांनाही तातडीने अटक करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा संजीव भोर यांनी दिला आहे.