तेलंगणात वीज, पाणी मोफत, महाराष्ट्रात का नाही? बीआरएस महाराष्ट्रात लढवणार २८८ जागा
By साहेबराव नरसाळे | Published: June 3, 2023 04:53 PM2023-06-03T16:53:45+5:302023-06-03T16:54:48+5:30
राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्यासाठी बीआरएस पक्षाची तयारी सुरु आहे.
अहमदनगर : तेलंगणा राज्यात भारत राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज, मुबलक पाणी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच प्रत्येक हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ते १० हजार रुपयांचे अनुदान वर्ग करीत आहेत. त्यामुळे तेथील एकही शेतकरी आत्महत्या करीत नाही. महाराष्ट्र हा सर्व बाबतीत समृद्ध असूनही हे महाराष्ट्रात का शक्य होत नाही, असा सवाल करीत के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन सुखी-समृद्ध करु शकतो, असे बीआरएस पक्षाचे राज्याचे समन्वयक दशरथ सावंत यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृहावर शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक टिळक भोस, संदीप राजळे, राजेश भाटिया, विवेक मोरे आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, २०१४ साली तेलंगणा स्वतंत्र राज्य झाले. त्यावेळी के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला तेथील जनतेने सत्ता दिली. सत्तेत आल्यानंतर त्यांनी देशाला दिशादर्शक ठरावेत, असे प्रकल्प राबविले. घरोघरी नळाचे शुद्ध पाणी पोहोचविले. मोफत वीज व मुबलक पाणी उपलब्ध करुन दिले.
राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्यासाठी बीआरएस पक्षाची तयारी सुरु आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. सदस्य नोंदणी अभियान संपल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातून शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यातील शेतीविकासाचे मॉडेल दाखविण्यासाठी सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.