नगर जिल्ह्यातील ६६ हजार शेतक-यांनी भरले वीजबिलाचे २२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 08:26 PM2017-11-22T20:26:44+5:302017-11-22T20:33:07+5:30
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजारपेक्षा अधिक शेतक-यांनी वीजबिलाचे २२ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. तर उर्वरित २ लाख ३० हजार कृषिपंप ग्राहकांनी योजनेस प्रतिसाद दिला नाही.
अहमदनगर : मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६५ हजारपेक्षा अधिक शेतक-यांनी वीजबिलाचे २२ कोटी रुपये महावितरणकडे भरले आहेत. तर उर्वरित २ लाख ३० हजार कृषिपंप ग्राहकांनी योजनेस प्रतिसाद दिला नाही. या ग्राहकांनी ३० नोव्हेंबरच्या अगोदर मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग घेऊन सवलतीचा लाभ मिळवावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
शेतक-यांच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६२ हजार कृषिपंप ग्राहकांकडे महावितरणची जवळपास ३ हजार ४६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार शेतक-यांकडे वीजबिलाची २ हजार २८५ कोटी रुपये एकूण तर दंड व व्याजाची रक्कम वगळता १ हजार ३३८ कोटी रुपये मूळ रक्कम थकीत आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ६५ हजार ३२९ शेतक-यांनी २२ कोटी ४६ लाख रुपयांच्या वीजबिलाचा भरणा महावितरणकडे केला आहे. योजनेनुसार ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास मूळ थकबाकीचे पाच समान हप्ते करून देण्यात येत आहेत तर ३० हजारपेक्षा अधिकची थकबाकी असल्यास मूळ थकीत रकमेचे दहा समान हप्त्याची मुभा देण्यात येत आहे. या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर मंडलाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी केले आहे.
जोडणीनंतर ६६ हजार ग्राहकांनी एकदाही बिलच भरले नाही
वीज जोडणी घेतल्यानंतर एकदाही वीजबिलाची रक्कम न भरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांची संख्या ६५ हजार ६९६ इतकी आहे. तर दुसरीकडे महावितरणने गेल्या तीन वर्षात १ लाख १०४३ कृषिपंप ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिली आहे. गेल्या दोन वर्षात एकदाही वीजबिल न भरणाºया जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांची संख्या ३ लाख ५५ हजारपेक्षा जास्त आहे. यातून महावितरणसमोरील आर्थिक अडचण लक्षात येऊ शकेल.