प्राथमिक शिक्षकांनी उभारले तीन कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:16 AM2021-05-03T04:16:17+5:302021-05-03T04:16:17+5:30
अहमदनगर : कोरोना काळात प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे शिक्षक फुकटचा पगार घेत असल्याची टीका होत होती. मात्र, याच शिक्षकांनी ...
अहमदनगर : कोरोना काळात प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे शिक्षक फुकटचा पगार घेत असल्याची टीका होत होती. मात्र, याच शिक्षकांनी गोरगरीब रुग्णांना वाचविण्यासाठी जिल्ह्यात तीन कोरोना सेंटर उभे केले आहेत. तर आणखी एक कोरोना सेंटर उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील इतर कोरोना सेंटरसाठी लाखो रुपयांचा निधी शिक्षकांनी उभा केला आहे.
अकोले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मिळून स्वतः एक कोविड केअर सेंटर निर्माण केले असून त्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा निधी उभारला आहे. संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सिंधू लॉन्स येथे एक तसेच चंदनापुरी येथे दोन कोविड सेंटर उभारले असून तेथे ऑक्सिजन बेडची सुविधा निर्माण केली आहे. यासाठी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सुमारे १० लाख रुपयांचा निधी उभारला आहे.
कोपरगाव व राहाता तालुक्यातील शिक्षकांनीही कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारून आवश्यक सुविधा पुरविल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील शिक्षकांनी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच नगरपालिकेचे नागरी आरोग्य केंद्र यासाठी ऑक्सिजन मशीन घेण्यासाठी साडेतीन लाख रुपयांचा निधी ३ दिवसांत उभा केला आहे. ऑक्सिजन मशीनची ऑर्डर दिली असून एक- दोन दिवसांत ते उपलब्ध होणार आहे.
शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी सुमारे ५ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी कोविड सेंटरसाठी स्वयंस्फूर्तीने जमा केला. नेवासा तालुक्यातील शिक्षकांनी भेंडा येथे कोविड सेंटरसाठी ३० बेड तसेच इतर साहित्य उपलब्ध करून दिले.
राहुरी तालुक्यातील शिक्षकांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मोठा निधी सुपुर्द केला. नगर तालुक्यातील शिक्षकांनीही लाखो रुपयांचा निधी उभा करून त्यातून आवश्यक साहित्य खरेदी केले.
आ. नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड केंद्रासाठी पारनेर तालुक्यातील शिक्षकांनी मोठा निधी उभा केला. श्रीगोंदा, घारगाव येथेही प्राथमिक शिक्षकांनी निधी उभारण्याचे काम हाती घेतले आहे. जामखेड तालुक्यातील आरोळे बंधू-भगिनींनी सुरू केलेल्या कोविड केंद्रासाठी तालुक्यातील शिक्षकांनी मोठा निधी सुपुर्द केला.
..............
७० लाखांपेक्षा अधिक निधी
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या निधीचा आकडा सुमारे ७० लाखांपेक्षा जास्त असून नजीकच्या काळात तो एक कोटीचा टप्पा ओलांडणार आहे. विशेष बाब म्हणजे या निधीसाठी सर्व तालुक्यांतील सर्व शिक्षकांनी आपल्यातील संघटनात्मक राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे हा निधी निर्माण केला.
याशिवाय प्राथमिक शिक्षक आपला एकदिवसाचा पगार कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला देणार आहेत.
...........................
कोविड सेंटर, सर्वेक्षणात शिक्षकांचे योगदान
जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शिक्षक हे कोरोना ड्यूटी करत आहेत. काही ठिकाणी सुरू असलेल्या कोविड सेंटरवर नेमणुका आहेत. काही जण पोलिसांना मदत करीत आहेत. अनेक महिला शिक्षिका आशा सेवकांसोबत जाऊन घरोघर कोरोनाग्रस्तांचा सर्व्हे करीत आहेत.
............
उर्दू शिक्षकही सरसावले
जिल्ह्यातील सर्व शिक्षक कोविडग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनी देखील स्वतंत्र निधी उभारला असून गेल्या तीन दिवसांत यामध्ये सुमारे चार लाख रुपये जमा झाले आहे. सदर निधी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते दिला जाणार आहे, अशी माहिती शिक्षक बँकेचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी दिली.
..............