अकरा दिवसात साईचरणी साडेसतरा कोटींचे दान; सुट्यांत तब्बल नऊ लाख भाविकांची साईदरबारी हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 03:45 PM2020-01-04T15:45:56+5:302020-01-04T15:47:46+5:30
नाताळाच्या सुट्या, नववर्षाचे स्वागत यानिमित्त तब्बल नऊ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. या काळात भाविकांनी साईचरणी सुमारे साडे सतरा कोटींचे दान अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
शिर्डी : नाताळाच्या सुट्या, नववर्षाचे स्वागत यानिमित्त तब्बल नऊ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. या काळात भाविकांनी साईचरणी सुमारे साडे सतरा कोटींचे दान अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
२३ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीतील नाताळ सुट्या, साई दर्शनाने व साक्षीने सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी देशाच्या कानाकोप-यातील भाविकांनी शिर्डीत साईदर्शनासाठी गर्दी केली होती़. या काळात जवळपास ८ लाख २३ हजार भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली़. दर्शन रांगेत ८ लाख ९७ हजार बुंदी प्रसाद पाकिटे वाटण्यात आली़. दर्शन न घेता मुखदर्शन व कळसाचे दर्शन घेऊन परतणारांची संख्याही अगणित आहे़. या कालावधीतील देणगीची शुक्रवारी मोजदाद करण्यात आली़. यात सुमारे १७.४२ कोटी रुपये देणगी प्राप्त झाल्याचे मुगळीकर यांनी सांगितले़.
याकाळात ८ लाख २३ हजार साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये टाइम बेस (बायोमेट्रीक), जनसंपर्क कार्यालय व आॅनलाईन या सेवांचा समावेश असून आॅनलाईन व सशुल्क दर्शन/आरती पासेसव्दारे ४ कोटी ८ लाख ६९ हजार रुपये प्राप्त झाले़. प्रसादालयातही या काळात ८ लाख ११ हजार साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा तर १ लाख ४७ हजार साईभक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला़.या अकरा दिवसात संस्थान भक्तनिवासात १ लाख ७२ हजार, तर तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मंडपात २८ हजार भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आल्याचेही मुगळीकर यांनी सांगितले़.
अशी आली देणगी...
अकरा दिवसांच्या कालावधीत दानपेटीतून ९ कोटी ५५ लाख, देणगी काउंटरद्वारे ३ कोटी ४७ लाख, डेबिट क्रे डिट कार्डव्दारे १ कोटी ३८ लाख २७ हजार, आॅनलाईन देणगीव्दारे ७३ लाख २९ हजार, चेक व डिडीव्दारे १ कोटी ५० लाख ८६ हजार, मनी आॅर्डरव्दारे ४ लाख ६४ हजार, परदेशी चलनाव्दारे २४ लाख ३६ हजार अशी १६ कोटी ९३ लाख ३७ हजार रुपये देणगी रक्कम स्वरुपात प्राप्त झालेली आहे. याशिवाय ४२ लाख ३ हजारांचे २१३.६८० ग्रॅम सोने व ५ लाख ८० हजारांच्या १७ हजार २२३ ग्रॅम चांदीचा समावेश आहे.