अकरावी प्रवेश : १३ जुलैपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:07 PM2019-06-13T12:07:14+5:302019-06-13T12:12:26+5:30
दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे़ अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाकडून उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़
अहमदनगर : दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे़ अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाकडून उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़ १३ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असून, १३ जुलै अखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे़
बुधवारी (दि़१२) नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजमधील राजर्षी शाहू महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता अकरावी प्रवेशाबाबत नियोजन बैठक घेण्यात आली़ प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे त्यांनी प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक घेतली़ बैठकीत प्रत्येक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमधील जागांचा आढावा घेऊन प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली़ अकरावी प्रवेशासाठी १३ ते २४ जून या काळात कॉलेज स्तरावर प्रवेश अर्जाचें वाटप करणे, २५ ते २८ जून दरम्यान भरलेले फॉर्म सादर करणे, २९ व ३० जून रोजी कॉलेज स्तरावर प्रवेश अर्जांची छाननी करणे, १ जुलै रोजी चेक लिस्ट प्रसिद्ध करुन आक्षेप दुरुस्ती करणे, २ जुलै रोजी प्रथम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे तसेच २ ते ६ जुलैपर्यंत प्रथम गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे, ८ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करुन १० जुलैपर्यंत दुसऱ्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे, ११ जून रोजी जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करुन १३ जुलैपर्यंत प्रवेश देण्याचे नियोजन उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहे़ १३ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया बंद करुन १५ जुलैपासून कॉलेज नियमित सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही जागा रिक्त असल्यास प्राचार्यांच्या अधिकारात २५ जुलैपर्यंत प्रवेश देण्याची मुभा देण्यात आली आहे़ मात्र, त्यानंतर प्रवेश झाल्यास संबंधित कॉलेजवर कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले़ गुणवत्तेनुसार प्रवेश देताना राखीव जागांचे प्रमाण काटेकोरपणे पाळावे, असेही आदेशात म्हटले आहे़ मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ५२ टक्के जागा व विशेष आरक्षणाच्या १३ टक्के जागा अशा एकूण ६५ टक्के जागा आरक्षणातून भरण्यात येणार आहेत़
अशी आहे आरक्षणाची टक्केवारी
एससी १३ टक्के, एसटी ७ टक्के, ओबीसी १९ टक्के, एसबीसी २ टक्के, एनटी (अ) ३ टक्के, एनटी (ब) २़५ टक्के, एनटी (क) ३़५ टक्के, एनटी (ड) २ टक्के अशा ५२ टक्के जागा जातीनिहाय आरक्षणातून भरल्या जाणार आहेत़ तर विशेष आरक्षणातून आजी-माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक व नोकरीत बदल झालेल्या शासकीय नोकरदारांच्या पाल्यांसाठी ५ टक्के जागा राखीव असतील़ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के व ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के जागा राखीव राहतील, असे शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी सांगितले़
प्रवेश अर्ज विनामूल्य
अनुदानित प्रवेश पूर्ण झाल्यानंतरच विनाअनुदानित जागांवरील प्रवेश सुरु करावेत़ विनाअनुदानित प्रवेश देताना जास्तीचे शुल्क आकारल्यास तसेच प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका देताना विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले़