अकरावीचा ‘कट आॅफ’ पाच टक्क्यांनी घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 04:59 PM2019-07-04T16:59:11+5:302019-07-04T17:02:42+5:30
मागील वर्षीपेक्षा यंदा अकरावीच्या विज्ञान व वाणिज्य शाखांचा ‘कट आॅफ’ पाच ते सात टक्क््यांनी घसरला आहे.
अहमदनगर : मागील वर्षीपेक्षा यंदा अकरावीच्या विज्ञान व वाणिज्य शाखांचा ‘कट आॅफ’ पाच ते सात टक्क््यांनी घसरला आहे. दुसरीकडे कला शाखेला विद्यार्थीच मिळत नसल्याने सर्वच महाविद्यालयांत या शाखेसाठी थेट प्रवेश दिला जात आहे.
जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल अकरा टक्क््यांनी कमी लागला आहे. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा कमी विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले. मंगळवारी शहरातील महाविद्यालयांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली. मागील वर्षी विज्ञानचा कट आॅफ ९५ टक्क््यांच्या पुढे होता. तो आता ९० पर्यंत खाली आला आहे.
रेसिडेन्सिअल ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान खुला प्रवर्ग ९३, तर वाणिज्यचा कट आॅफ (मराठी माध्यम) ७५ व ८८ (इंग्रजी माध्यम) असा राहिला. न्यू आर्टसमध्ये विज्ञान खुल्या वर्गाचा कट आॅफ ८५पर्यंत आला आहे. येथीलच वाणिज्य खुल्या वर्गातील मराठी माध्यमाचा कट आॅफ ६५, तर इंग्रजी माध्यमाचा कट आॅफ ८५ पर्यंत आला आहे. राधाबाई काळे महिला महाविद्यालयात खुल्या वर्गातील मुलींना विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायचा असेल तर ९० टक्क््यांच्या पुढे गुण हवेत. तर वाणिज्यसाठीही ७६ टक्के गुण हवेत. पहिल्या यादीत समावेश असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ६ जुलैपर्यंत निश्चित होतील. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आल्याने त्यांचा कट आॅफ स्वतंत्र्यरित्या जाहीर करण्यात आला आहे.
कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी असल्याने येथे उपलब्ध जागेच्या तुलनेत कमी अर्ज आले आहेत. त्यामुळे कला शाखेची गुणवत्ता यादी कोणत्याच महाविद्यालयाने जाहीर केलेली नाही. जेवढे अर्ज येतील त्या सर्व विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जाणार आहे.