अकरावीतील तरुणीनं केलं मरणोत्तर अवयवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 02:20 PM2018-09-05T14:20:16+5:302018-09-05T14:34:54+5:30
परमेश्वराने मला परिस्थितीशी संघर्ष करण-या आई - वडीलांच्या पोटी जन्माला घातले. आईने खूप लाड केले. छोटा भाऊ ओकांरशी दररोज हुज्जत घातली. खूप मजा केली.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : ‘‘परमेश्वराने मला परिस्थितीशी संघर्ष करण-या आई - वडीलांच्या पोटी जन्माला घातले. आईने खूप लाड केले. छोटा भाऊ ओकांरशी दररोज हुज्जत घातली. खूप मजा केली. शाळेत खूप मैत्रीणी भेटल्या, पण माझे हृदय निकामी झाले. त्यामध्ये दोष कुणाचा! मी मृत्युला आनंदाने सामोरे जात आहे. मृत्यूनंतर मात्र माझे डोळे काढा आणि दान करा’’ असे म्हणत अकरावीतील तरुणीनं जगाचा निरोप घेतला. श्रीगोंदा येथील इयत्ता अकरावीत शिकणा-या किरण विकास शिंदे (वय-१७) या मुलीने सामाजिक संदेश देत आज सकाळी जगाचा निरोप घेतला.
मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी दौंड येथील डॉ. प्रेमकुमार भट्टड यांनी किरणचे डोळे शस्त्रक्रिया करून पुणे येथील रुबी आय बँककडे पाठवून दिले. किरणच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तीच्या जीवनात सृष्टीचे किरण येणार आहेत. श्रीगोंदा शहरातील विकास शिंदे व सुनीता शिंदे या जोडप्याला किरण आणि ओकांर ही दोन अपत्य. वडील हे टमटम तर आई दुकानामध्ये कामाला. किरणचे हृदय लहानपणापासून कमकुवत होते. आई-वडीलांनी किरणचा आजार बरा होण्यासाठी अखेपर्यत जीव ओतला. डॉ. अनील घोडके व सतिश बोरा यांनी मदत केली.
किरण शाळेत हुशार होती. श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. हृदयाचा त्रास झाला. मृत्युशी झुंज चालू असताना तिला जाणवले की आपणास जगाचा निरोप घ्यावा लागणार. बारामती येथील डॉक्टरांनी तिला तीन दिवसापूर्वी घरी घेऊन जाण्यास सांगितले.
घरी येताना तिने सतिश बोरा यांच्याशी अखेरचा संवाद साधला. ‘‘ काका, मी उद्या मरणार ना! मी कॉलेजला जाऊ शकणार नाही ना! ओकांरशी आता कोण हुज्जत घालणार! काका माझ्यासाठी तुम्ही खुप प्रयत्न केले. मी गेल्यानंतर माझे डोळे दान करा. माझ्या नेत्रदानातून दोघेजण सुंदर जग पाहतील, याचा मला मोठा आनंद होईल’’ या उद्गाराने सतिश बोरा स्तब्ध झाले होते. अखेर आज किरणने जगाचा निरोप घेतला.
समाजात वयोवृद्ध माणसे मरणोत्तर नेत्रदान करण्याचे धाडस दाखवत नाहीत. पण अकरावीत शिकणा-या किरणने मरणोत्तर नेत्रदान केले. त्यामुळे किरणचा आदर्श समाजाने घ्यावा. - डॉ. प्रेमकुमार भट्टड, नेत्रतज्ञ