‘हवाय सातवा वेतन आयोग’; मनपा कर्मचारी संघटनेचा आझाद मैदानावर एल्गार
By अरुण वाघमोडे | Published: October 31, 2023 05:57 PM2023-10-31T17:57:57+5:302023-10-31T17:58:28+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेच्यावतीने २ ऑक्टोबर रोजी नगर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च सुरू केला होता.
अहमदनगर : सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी आता महापालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने मुंबईतील आझाद मैदान येथे मंगळवारपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेच्यावतीने २ ऑक्टोबर रोजी नगर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च सुरू केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याने संघटनेने आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान गेल्या २५ दिवसांत मागण्यांबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने संघटनेच्यावतीने आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांचे दोन्ही प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची माघार घेणार नाही, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला आहे. या आंदोलनात लोखंडे यांच्यासह संघटनेचे सरचिटणीस आनंदराव वायकर, उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल, बलराज गायकवाड, विठ्ठल उमाप, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, राजू पठारे, अजय सौदे आदींसह कर्मचारी सहभागी झाले आहेत.