शेतमालाला रास्त भाव मिळेपर्यत एल्गार सुरुच राहणार - डॉ. अजित नवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:28 AM2018-05-25T11:28:27+5:302018-05-25T11:28:47+5:30
भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून केंद्र व राज्य सरकारला शेतक-यांचे काहीच घेणंदेणं नाही. जगाचा पोशिंदा बळीराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार असा इशारा शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी दिला.
अकोले : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे असून केंद्र व राज्य सरकारला शेतक-यांचे काहीच घेणंदेणं नाही. जगाचा पोशिंदा बळीराजा अडचणीत आला आहे. दुधाला व शेतमालाला रास्त भाव मिळेपर्यंत शेतकरी लढ्याचा एल्गार सुरूच राहणार असा इशारा शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांनी दिला.
तालुक्यातील कळस बुद्रुक येथे आज सकाळी ८ वाजता छावा वारियर्स व कळस बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने शेतक-यांच्या प्रश्नावर रास्तारोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी कोल्हार घोटी राजमार्ग सुमारे दोन तास अडवून धरीत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला. यावेळी कळस बुद्रुक ग्रामस्थांनी आपापली सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेऊन या रास्तारोको आंदोलनाला पाठिंबा दिला.
डॉ.अजित नवले म्हणाले, या सरकारच्या काळात शेतमालाला बाजारभाव नाही. शेतीला केलेला खर्च सुद्धा फिटत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून तो आत्महत्या करीत आहे. शेतकरी संघटना शेतक-यांसाठी लढा उभारीत असून सर्व शेतक-यांनी या लढ्यात सहभागी होऊन ही चळवळ अधिक व्यापक करावी, असे आवाहन डॉ.नवले यांनी केले. रास्तारोको आंदोलनाचे सुत्रसंचालन आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केले. रास्तारोको आंदोलनामुळे कोल्हार घोटी राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रास्तारोको आंदोलनास संभाजी ब्रिगेडचे डॉ.संदीप कडलग, सोन्याबापू वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, निवृत्ती मोहिते, अरुण वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे उपस्थित होते.