नगर अर्बन बँकेत अपहार; तीन डॉक्टरांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 08:36 AM2021-06-27T08:36:21+5:302021-06-27T08:36:45+5:30
डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे अशी अटक झालेल्या तिघा डॉक्टरांची नावे आहेत. बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या पैशांतील ६ कोटी ४ लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे तपासात समोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणात पिंपरी-चिंचवडच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री नगरमधील ३ डॉक्टरांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे अशी अटक झालेल्या तिघा डॉक्टरांची नावे आहेत. बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या पैशांतील ६ कोटी ४ लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे तपासात समोर आले. २२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर बँकेच्या चिंचवड शाखेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारीरोजी कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण, यज्ञेश चव्हाण, मंजूदेवी हरिओम प्रसाद, रामचंद्र तांबिले, अभिजित घुले यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य व बँकेच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी नगर येथील आशुतोष लांडगे याच्यासह इतर आठ जणांना अटक केली. दरम्यान, लांडगे याच्या खात्यावर अपहारातील ११ कोटी वर्ग झाल्याचे समोर आले. तसेच तिघा डॉक्टरांच्या खात्यावरही पैसे वर्ग झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या डॉक्टरांना अटक केली. या डॉक्टरांच्या खात्यावर अपहारातील रक्कम का वर्ग झाली, त्यांचा या अपहारात काही सहभाग आहे का, आदींबाबत पुढील चौकशी करणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.