राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा : खा. अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:39 PM2018-10-09T18:39:24+5:302018-10-09T19:24:06+5:30
पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे.
अहमदनगर : पाऊस नसल्याने राज्यात सगळीकडेच शेतक-यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. मराठवाडा व विदर्भात परिस्थिती खूपच भयानक आहे. त्यामुळे सरकारने पाहणी अहवालाची वाट न पाहता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा अहमदनगर शहरात दाखल झाली. यावेळी ‘लोकमत’ कार्यालयास त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संवाद साधला.
खासदार चव्हाण म्हणाले, देशभरात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन-चार रुपयांनी भाव कमी करणे ही फसवणूक आहे. एकीकडे भाव कमी केले जातात तर दुसरीकडे दररोज भाव वाढविले जात आहेत. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय रुपयाचे अवमूल्यन होत असल्यामुळे महागाई वाढत आहे. त्यामुळे भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. नवरात्र, दिवाळीचे सण आता सुरु होत आहे. या सणांमध्ये भारनियमन सुरु केले आहे. पाऊस नसल्याने विद्युत पंप सुरु नाहीत. त्यामुळे सरकार सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे. राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा सुरु असली तरी त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.