जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी कोपरगावात कर्मचारी एकवटले
By रोहित टेके | Updated: March 14, 2023 18:12 IST2023-03-14T18:10:54+5:302023-03-14T18:12:58+5:30
कोपरगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सरकारी कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी कोपरगावात कर्मचारी एकवटले
कोपरगाव : (जि. अहमदनगर ) जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यभर शिक्षक संघटना आणि शासकीय कर्मचारी संघटना आंदोलन करत आहे. मंगळवारी (दि.१४) याच संघटना कडून कोपरगाव तालुक्यात मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षक संघटना, महसूल संघटना, पंचायत समिती कर्मचारी संघटना, नगरपरिषद संघटना यासह १५ पेक्षाजास्त शासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
कोपरगाव तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात सरकारी कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील कार्यालय परिसरात सर्व जमल्यानंतर “एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. यासह सरकार विरोधात जोरदार घोषणांनी तहसील कार्यालयं परिसर दणाणले होते. अनेक दिवसांपासून मागणी करूनही तोडगा निघत नसल्यानं कर्मचारी आक्रमक झाले होते. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत संपत सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.