श्रीरामपूर पालिकेचे कर्मचारी विम्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:20 AM2021-05-12T04:20:50+5:302021-05-12T04:20:50+5:30
पालिकेच्या सर्व विभागातील शंभर कर्मचाऱ्यांची सोमवारी कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, नगरसेविका प्रणिती चव्हाण, नगरसेवक राजेश ...
पालिकेच्या सर्व विभागातील शंभर कर्मचाऱ्यांची सोमवारी कोरोना तपासणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, नगरसेविका प्रणिती चव्हाण, नगरसेवक राजेश अलघ, कामगार नेते दीपक चरण चव्हाण उपस्थित होते. नगरसेविका चव्हाण यांनी सर्वच कर्मचारी कोरोना काळात जबाबदारी सांभाळत असल्याने पालिकेने त्यांचे प्राधान्याने लसीकरण, आरोग्य विमा आणि कोरोना तपासणी करावी, असे लेखी निवेदन दिले.
काही कायम कर्मचाऱ्यांचे लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे आघाडीवरील या कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के लसीचा साठा राखीव ठेवण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे. २५१ घनकचरा कामगार, १२ औषधे फवारणी करणारे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे १४, तर पाणी पुरवठाचे ६१, बांधकाम विभागाचे ५१, वसुलीचे ७ आणि इतर विभागातील ६८ अशा एकूण ४६४ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांचा गत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून आरोग्य विमा उतरवण्यात आलेला नाही. जबाबदारी असतानाही संबंधित ठेकेदाराने कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा, गणवेश, थकीत वेतन, ओळख पत्र दिलेले नाही. नगरपालिका प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.
रुग्णवाहिका, स्वर्रथ, शववाहिका, अग्निशमन, अंत्यविधी दहन कर्मचारी, पाण्याच्या टँकरवरील चालक, मदतनीस यांनाही आरोग्य विमा, पीपीई किट उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी कायम व रोजंदारीवरील ९४५ कामगारांपैकी २४७ कायम कामगार यांचा चार लाख ५६ हजार रुपये खर्च करून प्रत्येकी दोन लाख रुपयांचा आरोग्य विमा उतरवला, याबद्दल नगरसेविका चव्हाण व दीपक चव्हाण यांनी आभार व्यक्त केले आहे.