राळेगण म्हसोबा येथील २८ एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 06:58 PM2017-12-19T18:58:07+5:302017-12-19T18:59:32+5:30
राळेगण म्हसोबा गावातील सरकारी जमिनीवरील वृक्षांची तोड करुन अतिक्रमण करण्यात आले आहे. या तक्रारीला वर्ष उलटले तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला व वृक्षतोडीला प्रांताधिका-यांचेच अभय असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
अहमदनगर : नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा गावातील सरकारी जमिनीवरील वृक्षांची तोड करुन अतिक्रमण करण्यात आले आहे. याप्रकरणी हनुमंत बजाबा कचरे व संजय गणपत पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रांताधिकारी यांच्याकडे आॅक्टोबर २०१६ मध्ये तक्रार केली होती. या तक्रारीला वर्ष उलटले तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला व वृक्षतोडीला प्रांताधिका-यांचेच अभय असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
राळेगण म्हसोबा गावातील आडवामाळ येथील गट नं. १४० व गट नं. २७७ या सरकारी गायरान हद्दीतील जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाने २००५-२००६ मध्ये वृक्षलागवड केली होती. मात्र ही चांगल्या स्थितीतील आणि मोठी झालेली झाडे यंत्राच्या साहाय्याने काढून टाकण्यात आली. या जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले तसेच या जमिनीत बोअरवेलही घेण्यात आला. या सरकारी जमिनीवर संबंधिताने इंदिरा आवास योजनेतून २०१५- १६ साली घरकूल बांधले आहे. या गटाच्या जवळच गुणवडी तलाव असल्याने पाण्याची अवैध पाइपलाइन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. याच परिसरातील अनेक लोक या गायरानावर शेळ््या, मेंढ्या व गावरान जनावरे चारण्यास आणतात. मात्र या अतिक्रमणामुळे त्यांनाही अटकाव करण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाºयावर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या गटातील जमिनीची मोजणी करुन पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच पुन्हा वृक्षलागवड करुन सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन करण्यात यावे. या मागणीची दखल न घेतल्यास शेळ््या-मेंढ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही ग्रामस्थांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
अतिक्रमणप्रकरणी गावातील ६५ लोकांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती. यानंतर तत्कालीन सर्कल वाघ व कामगार तलाठी यांनी पाहणी करुन तहसीलदारांनी अहवाल पाठविला आहे. त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
सर्वच झाडे जळाली कशी?
या अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून अधिकाºयांची दिशाभूल केली जात आहे. खोटी माहिती दिली जात आहे. या गटातील सर्वच झाडे दुष्काळामुळे कशी जळू शकतात. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी.
- संजय पवार, तक्रारदार