शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:43+5:302021-01-09T04:17:43+5:30
अहमदनगर : शासकीय जागेत केलेले अतिक्रमण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना चांगलेच भोवले असून याप्रकरणी राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील उपसरपंच व ...
अहमदनगर : शासकीय जागेत केलेले अतिक्रमण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना चांगलेच भोवले असून याप्रकरणी राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील उपसरपंच व दोन सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले आहे.
मोमीन आखाडा येथील सरपंच अशोक गेणू कोहकडे यांनी याबाबत २८ आॅक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. उपसरपंच रंजना सोपान शिंदे, सदस्य चंद्रकला दत्तात्रय कोहकडे व शेख अल्लाउद्दीन याकूब यांनी मोमीन आखाडा येथील शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, असे सरपंच कोहकडे यांनी तक्रारीत म्हटले होते. अर्जदार सरपंच अशोक कोहकडे यांच्या वतीने ॲड. योगेश गेरंगे यांनी युक्तीवाद केला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १४ (ज) ३ प्रमाणे शासकीय जागेवर अतिक्रमण करणे अथवा अतिक्रमण करून बांधकाम केल्यास ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयात २०१८मधील एका याचिकेवरही या विषयावर सविस्तर विवेचन नोंदवलेले आहे. त्याचा संदर्भ देत ॲड. गेरंगे यांनी युक्तीवाद केला. उपसरपंच शिंदे व सदस्य कोहकडे, शेख यांनी ग्रामपंचायतीच्या मिळकत क्रमांक १८७/१,१८७/२,२१६,२२०मध्ये अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरून ६ जानेवारी २०२१ रोजी उपसरपंचासह दोन सदस्यांना अपात्र ठरविले. त्यामुळे या तिघांचेही सदस्यत्व आता रद्द झाले आहे.