जामखेडमधील खर्डा चौक ते अमरधाम रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:16 PM2018-10-10T12:16:23+5:302018-10-10T12:42:36+5:30
खर्डा चौक ते अमरधाम या रस्त्यावरील २६ अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम करून रस्ता अरुंद केला.
जामखेड : खर्डा चौक ते अमरधाम या रस्त्यावरील २६ अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम करून रस्ता अरुंद केला. आज सकाळी दहाच्या सुमारास पोलीस फौजफाट्यासह या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. तहसीलदार तथा मुख्याधिकारी विशाल नाईकवडे यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येत आहे.
नगरपरिषद अंतर्गत खर्डा चौक ते अमरधाम हा महत्त्वाचा असलेला सव्वा चार कोटी रुपये खर्चाचा रस्त्याचे काम सुरू झाले. परंतु अंदाजपत्रकाप्रमाणे असलेल्या रस्त्याच्या कामास पक्क्या बांधकामाचा अडथळा ठरला होता. त्यामुळे तहसीलदार तथा मुख्याधिकारी विशाल नाईकवडे यांनी सदर अतिक्रमणे काढण्यासाठी सुरवातीला खुणा करून करून देण्यात आल्या. त्यानंतर न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येऊन सर्व २६ अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावण्यात येऊन आठ दिवसात अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले. हि मुदत संपत आहे. तसेच महावितरण, सार्वजनिक बांधकाम, भारत दूरसंचार निगम, पोलीस स्टेशन यांना पत्रव्यवहार करून ४ व ५ आॅक्टोबर तारीख निश्चित केले होते. परंतु पुरेसा पोलीस फौजफाटा न मिळाल्याने अतिक्रमण काही काळ स्थगित झाले होते.
आज बुधवार (दि. १०) रोजी सकाळी दहाच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तात व अतिक्रमण पथकासह रस्त्याचे शेवटचे टोक अमरधाम पासून तहसीलदार तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेकांनी टप-या स्वरूपातील, तसेच घरासमोरील शेड, कंपोड काढण्यास सुरुवात केली. तर काही पक्के अतिक्रमण धारकांनी दोन तासाची मुदत मागवून घेतली आहे. खर्डा चौक ते आमरधाम या रस्त्यावरील अतिक्रमण निघत असल्याने रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.