शिंगवे केशव येथील पाझर तलावात अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:00 PM2018-05-28T14:00:32+5:302018-05-28T14:04:14+5:30
पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या पाझर तलाव क्षेत्रालगत नगर येथील एका व्यापाऱ्याने अतिक्रमण करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे.
मिरी: पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या पाझर तलाव क्षेत्रालगत नगर येथील एका व्यापाऱ्याने अतिक्रमण करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे.
शिंगवे केशव येथील गट क्रमांक ४०९, ९ व १० या क्षेत्रात सुमारे ४६ वर्षांपासून पाझर तलाव अस्तित्वात आहे. या तलावाच्या पाण्यावरच गावातील शेती अवलंबून आहे. काही प्रमाणात पिण्यासाठी देखील या तलावाच्या पाण्याचा वापर ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून केला जात आहे.परंतु या तलाव क्षेत्राच्या लगतच नगर येथील एका व्यापा-याचे क्षेत्र असल्याने त्याने तलाव क्षेत्रातच अतिक्रमण करून तलावाच्या भिंतीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे तलावाच्या भिंतीला तडे पडून पाणी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी सबंधित व्यापा-यास समज दिली असता त्याने अतिक्रमणामुळे तलावाच्या भिंतीला पडलेले खड्डे व तडे दुरूस्त करून देतो, असे सांगितले. परंतु गेल्या दहा दिवसांपासून कोणतेही दुरुस्तीचे काम झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वांबोरी चारीच्या माध्यमातून या भागाला मिळणारे पाणीदेखील याच तलावात सोडले जात आहे. तसेच पावसाचे पाणी देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने तलावाची लवकरात लवकर दुरूस्ती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तसा ठराव देखील ग्रामसभेत करण्यात आलेला आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांमध्ये संबधित व्यापा-याने तलाव दुरूस्ती न केल्यास त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
महसूल व ग्रामपंचायतीच्या दफ्तरी तलावाची नोंदच नाही
या तलावाची मुळा पाटबंधारे विभागाकडे केशव शिंगवे- ७३ पाझर तलाव अशी नोंद आढळते. यामुळे सुमारे दहा वर्षांपासून येथील शेतकरी लोकवर्गणीतून वांबोरी चारीची पाणीपट्टी देखील भरीत आले आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या तलावाची दोन वेळेस दुरूस्ती देखील करण्यात आली होती, परंतु असे असतानाही स्थानिक पातळीवरील महसूला व ग्रामपंचायत कार्यालयात या तलावाची स्वतंत्र नोंद आढळून येत नसल्याने अधिकारी व ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.