ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 06:04 PM2019-02-26T18:04:49+5:302019-02-26T18:04:54+5:30
येत्या लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीकडे निवडणुक आयोग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मतदान यंत्र विरोधी जन आंदोलनाच्या वतीने अरणगाव रोड येथील इंदिरानगर परिसरात ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढून त्याचा दफनविधी करण्यात आला.
अहमदनगर : येत्या लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीकडे निवडणुक आयोग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ मतदान यंत्र विरोधी जन आंदोलनाच्या वतीने अरणगाव रोड येथील इंदिरानगर परिसरात ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढून त्याचा दफनविधी करण्यात आला.
जालिंदर चोभे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मच्छिंद्र तिजोरे, आदिनाथ थोरे, दिपक भिंगारदिवे, संतोष तिजोरे, सनी गायकवाड, कुशाबा काळे, गोरख जाधव, कैलास साळवे, श्याम कांबळे, दिगंबर तिजोरे, संगीता तिजोरे, कमलाबाई मिरपगार आदिंसह नागरिक सहभागी झाले होते.
२०१४ मध्ये ईव्हीएम मशीन सेटिंग करुन मतदान घेतले गेले. यामुळे मते चोरी झाली तर काही ठिकाणी व्हीव्हीपॅटने मतदार यादीपेक्षा अधिक मते दाखवली. म्हणूनच एक महिन्याच्या आत सर्व ईव्हीएम मशीन भंगारात काढण्यात आले आहे. काही महिन्यांपुर्वी ईव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅटचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. या मशीन तातडीने बदलण्यात आले असून हा कारभार पुर्णत: संशयास्पद आहे. पुर्वी घेतलेले प्रशिक्षण व केलेली खात्री व्यर्थ गेली असून, नवीन मशीनची अचूकता व खात्रीवर प्रश्न चिन्ह असल्याचा आरोप चोभे यांनी केला आहे. लोकशाही टिकविण्यासाठी व ईव्हीएम चे घोटाळे हद्दपार करण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावे व क्रॉस चेकिंग मत पडताळणीचा अधिकार सर्व उमेदवारांना देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.