वर्षअखेरीस गाजले रेखा जरे हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:27 AM2020-12-30T04:27:29+5:302020-12-30T04:27:29+5:30
मार्च ते सप्टेंबर, असे पाच ते सहा महिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीतच पोलिसांचा सर्वाधिक जास्त ...
मार्च ते सप्टेंबर, असे पाच ते सहा महिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीतच पोलिसांचा सर्वाधिक जास्त वेळ गेला. बहुतांशी दिवस लॉकडाऊन असल्याने मार्च ते जूनपर्यंत जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख खाली आला होता. अनलॉक हाेताच पुन्हा जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली.
साडेपाच महिन्यांतच जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची अवघ्या साडेपाच महिन्यांतच बदली झाली. सिंह यांनी २ एप्रिल रोजी नगरचा पदभार स्वीकारला होता.
त्यांची ३ सप्टेंबर रोजी मुदतपूर्व बदली करण्यात आली. जिल्ह्यात प्रभावी कामकाज न झाल्याने त्यांची बदली झाल्याची चर्चा होती.
अप्पर पोलीस अधीक्षकांची व्हायरल क्लिप गाजली
अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांची एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह संभाषणाची ऑडिओ क्लिप ऑक्टोबर महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाली. ती चांगलीच गाजली. याचदरम्यान राठोड यांची नगरमधून बदली झाली. याप्रकरणी सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
तीनपटींनी वाढले सायबर क्राईम
वर्षभरात जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीसंदर्भात तब्बल १ हजार ९२८ तक्रारी दाखल झाल्याने मागील तीन ते चार वर्षांत हे प्रमाण तब्बल चारपटींनी वाढले आहे.
जरे हत्याकांडाने खळबळ
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी गळा चिरून हत्या झाली. हे हत्याकांड सध्या जिल्हाभरात गाजत आहे. पत्रकार बाळ बोठे याने सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.