नगरमधील एटीएम चोरट्यांच्या हवाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:26 AM2019-05-18T11:26:19+5:302019-05-18T11:26:31+5:30
सुरक्षा रक्षक नाही़़़ दरवाजांना लॉक नाही़़़अलार्मही वाजत नाही आणि कॅमेरेही सुस्थितीत नाही़ अशी दयनीय अवस्था नगर शहरातील विविध बँकांच्या एटीएम रुमची असल्याचे ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे़
अरुण वाघमोडे
अहमदनगर : सुरक्षा रक्षक नाही़़़ दरवाजांना लॉक नाही़़़अलार्मही वाजत नाही आणि कॅमेरेही सुस्थितीत नाही़ अशी दयनीय अवस्था नगर शहरातील विविध बँकांच्या एटीएम रुमची असल्याचे ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे़ सुरक्षेची कोणतीच उपाययोजना नसलेल्या या एटीएममध्ये भरदिवसा चोरटे घुसतात आणि अनेकांच्या पैशांवर डल्ला मारतात़ रात्री तर गॅस कटरने एटीएम मशीन तोडून पैसेही चोरून नेतात़ एटीएमच्या सुरक्षेकडे बँकांचे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहेत़
सहा दिवसांपूर्वी चोरट्यांनी केडगाव येथील अॅक्सिस बँकेचे एटीएम गॅस कटरने तोडून ८ लाख ३८ हजार रुपये चोरून नेले़ या घटनेनंतर दोनच दिवसांची चोरट्यांनी गुलमोहर रोडवरील आंध्र बँकेचे व नगर-मनमाड रोडवरील अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला़ चोरट्यांना हे एटीएम फोडता न आल्याने तेथील रक्कम चोरता आली नाही़ ज्या एटीएममध्ये चोरट्यांनी चोरी केली आणि जे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला तेथे बँकेने सुरक्षारक्षक नेमलेला नव्हता तसेच चोरटे एटीएम फोडत होते तेव्हा अलार्मही कुणाला ऐकायला आला नाही़ शहरात घडलेल्या तीन घटनांमुळे एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे़
एटीएमला सुरक्षा रक्षक नसल्याने भरदिवसा एटीएममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी अनेकांची फसवणूक केली आहे़ कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील एटीएममध्ये फसवणुकीच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत़ वृद्ध व्यक्ती अथवा ग्रामीण भागातील ज्येष्ठ एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले तर दबा धरून बसलेले चोरटे त्यांच्या पाठोपाठ एटीएममध्ये प्रवेश करतात़ पैसे काढण्यास आम्ही तुम्हाला मदत करतो़ असे म्हणून त्यांच्या हातातील एटीएम घेतात़ पासवर्डही विचारून घेतात़ त्यानंतर त्यांना बनावट एटीएम देतात़ दुसऱ्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढून घेतात़ ज्या एटीएम कक्षाला सुरक्षा रक्षक नाही त्याच ठिकाणीच असे फसवणुकीचे प्रकार व एटीएम मशीन फोडण्याच्या घटना घडल्या आहेत़
नगर शहरात व उपनगरात शासकीय, सहकारी व खासगी बँकांचे एकूण 1५० पेक्षा जास्त एटीएम आहेत़ ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून गुरुवारी आणि शुक्रवारी शहरातील या एटीएम कक्षांची पाहणी केली तेव्हा ९० टक्के एटीएमसमोर सुरक्षा रक्षक दिसले नाहीत़ काही एटीएमचे दरवाजे तुटलेले होते, काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही दिसले नाही़
रात्री पैसे काढणे ठरतेय धोक्याचे
नगर शहरातील ९० टक्के एटीएम रुमला सुरक्षा रक्षक नसल्याने रात्री या एटीएम मशीनमधून पैसे काढणे नागरिकांसाठी धोक्याचे ठरले आहे़ एटीएममधून पैसे काढून बाहेर आल्यानंतर ते पैसे लुटण्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी शहरात घडले आहेत़ तर एटीएममध्येच एटीएम कार्ड बदलण्याचेही प्रकार घडले आहेत़
तीन वर्षांत २६ एटीएम फोडण्याचा प्रयत्न
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत चोरट्यांनी विविध बँकांचे २६ एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यांना मात्र पैसे चोरता आले नाही़
सहा दिवसांपूर्वी मात्र केडगाव येथे चोरटे एटीएम फोडून पैसे चोरण्यात यशस्वी झाले आहेत़ २६ पैकी एटीएम फोडीच्या दहा घटना नगर शहरातील आहेत तर २६ पैकी तब्बल १४ घटनांचा पोलिसांना तपास लागलेला नाही़
कॅमे-यावर स्प्रे मारून एटीएमवर हल्ला
एटीएम मशीन कक्षात कॅमेरे लावलेले असतात़ चार दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेºयावर ब्लॅक स्प्रे मारला़ या स्पे्रमुळे चोरटे कृती करताना कॅमे-यात दिसले नाही़
पोलिसांच्या सूचनेकडे बँकांचे दुर्लक्ष
दीड महिन्यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी नगर शहरातील बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती़ या बैठकीत एटीएमला सुरक्षा रक्षक नेमावेत, अलार्म लावावा, कॅमेरे चांगल्या स्थितीतील ठेवावेत़ अशा सूचना दिल्या होत्या़
यावेळी बँकेच्या अधिकाºयांनी मात्र हे धोरणात्मक निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडून ठरतात असे सांगत हात वर केले होते़
एटीएमच्या सुरक्षेबाबत बँकांनी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना नगर शहरातील सर्व बँकांना दिलेल्या आहेत़ एटीएमसमोर सुरक्षा रक्षक असेल तर चोरीच्या घटना टळतात़ एटीएममध्ये सुरक्षा रक्षकासह सीसीटीव्ही कॅमेरे व अलार्म सिस्टिम लावावी़ कुठे काही घडले तर तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी़ शहरातील चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी दिवसा व रात्रीची पेट्रोलिंग वाढविण्यात आलेली आहे़ - संदीप मिटके, पोलीस उपअधीक्षक, नगर शहर
एटीएम कक्षासमोर सुरक्षा रक्षक नेमणे ही प्रत्येक बँकेची जबाबदारी आहे़ तशा सूचना रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या आहेत़ एटीएमसेवेचा वापर करणा-या ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहणे गरजेचे आहे़ नगरमधील बँकांनीही आपल्या एटीएमसमोर सुरक्षारक्षक नेमावेत़- तुकाराम गायकवाड, अग्रणी बँक अधिकारी