उद्योजकाने कंपनीतील ऑक्सिजन सिलिंडर केले दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:10+5:302021-04-22T04:20:10+5:30
पिंपळगाव माळवी : सध्या राज्यात व नगर शहरांमधील विविध हॉस्पिटलचा ऑक्सिजनचा पुरवठा संपत आल्यामुळे कोरोना रुग्णांवर आणीबाणीची परिस्थिती आली ...
पिंपळगाव माळवी : सध्या राज्यात व नगर शहरांमधील विविध हॉस्पिटलचा ऑक्सिजनचा पुरवठा संपत आल्यामुळे कोरोना रुग्णांवर आणीबाणीची परिस्थिती आली आहे. ही माहिती समजल्यानंतर नगर एमआयडीसीमधील उद्योजक व पिंपळगाव माळवीचे माजी सरपंच सुभाष झिने यांनी आपल्या कंपनीतील पाच ऑक्सिजन सिलिंडर नगरमधील एका हॉस्पिटलला दान केले.
सध्या नगर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून विविध हॉस्पिटलमध्ये रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही. सध्या ऑक्सिजनचा पुरवठादेखील सुरळीत होत नाही ही परिस्थिती पाहून एमआयडीसीतील अहमदनगर अलाइज कंपनीचे मालक सुभाष झिने यांनी आपल्या कंपनीतील पाच ऑक्सिजन सिलिंडर नगर येथील स्वास्थ्य हॉस्पिटलला दान केले. आपल्या कंपनीतील उत्पादनापेक्षा गरजू रुग्णांचे प्राण वाचणे ही त्यांची यामागील भूमिका खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. आजच्या जगात माणुसकी शिल्लक आहे याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांनी उत्पादन बंद करून ऑक्सिजन सिलिंडर दान करून समाजापुढे चांगला आदर्श ठेवला आहे. दोन वर्षांपूर्वी पिंपळगाव माळवी गावात पाणीटंचाई होती. त्या काळातदेखील सुभाष झिने यांनी स्वखर्चाने गावात टँकरने पाणीपुरवठा केला होता.