शिर्डीलगतच्या साकोरीत महामारी, प्लेगचे मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:27+5:302021-05-25T04:23:27+5:30
प्रमोद आहेर शिर्डी : जीवघेण्या आजारालाही आपल्या देशात देवत्व येऊ शकत. मंदिर उभं राहू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ...
प्रमोद आहेर
शिर्डी : जीवघेण्या आजारालाही आपल्या देशात देवत्व येऊ शकत. मंदिर उभं राहू शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्लेगच्या साथीच्या काळात शिर्डीजवळील साकोरी येथे उभारलेले प्लेगचे मंदिर. गेल्या शंभर वर्षांपूर्वी प्लेगने हजारो लोकांचे जीव घेतले. या महामारीपासून बचाव होण्यासाठी प्लेगचे मंदिर उभारून पूजा करण्यात येऊ लागली.
शिर्डीजवळील साकोरी येथेही अनेक दशकांपूर्वी महामारीचा प्रकोप टाळण्यासाठी सद्गुरु उपासनी महाराजांच्या पुढाकारातून महामारी, प्लेगचे मंदिर बनवण्यात आले आहे. या मंदिरात आजही पूजाअर्चा करण्यात येते. गेल्या दीड महिन्यापासून कन्याकुमारी आश्रमातील कन्या येथे रोज सकाळी अभिषेक करतात.
जवळपास शंभर वर्षांपूर्वी महामारीने शिर्डीसह परिसरात थैमान घातल्याच्या नोंदी आहेत. शिर्डीसारख्या अगदी लहान दीड हजार लोकसंख्येच्या गावात १९१२ मधील प्लेगच्या साथीने तब्बल ७१ बळी गेले होते. हीच परिस्थिती पंचक्रोशीची होती.
साईबाबांच्या सहवासात असलेल्या सद्गुरू उपासनी महाराजांची साकोरीत कन्याकुमारी देवस्थानाची स्थापना केलेली आहे. येथे कन्या वेदाध्यायन व पूजापाठ करतात, असे जयमाला कुलकर्णी यांनी सांगितले.
.................
दुर्जनाला विरोध केला तर तो अधिक त्रास देतो, म्हणून त्यांना वंदन करून मान द्यायचा असतो. याच भावनेतून उपासनी महाराजांनी महामारी व प्लेगला देवता स्वरूप मानून त्यांची शंकराच्या मंदिरात स्थापना केली. मंदिरात एका बाजूला महामारी तर दुसऱ्या बाजूला प्लेगची मूर्ती आहे. या मूर्त्यांच्या स्थापनेनंतर महामारी कमी झाली होती, असे सांगतात. या मंदिरात रोज पूजाअर्चा करण्यात येते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आश्रमातील कन्या रोज रुद्राभिषेक करून अवघ्या भुतलावरील कोरोनाचे संकट दूर होवो म्हणून प्रार्थना करतात.
-प. पू. कन्याकुमारी माधवीताई, प्रमुख विश्वस्त, उपासनी कन्याकुमारी संस्थान, साकोरी