अहमदनगर : छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारा; स्मारक कृती समितीचे उपोषण
By अरुण वाघमोडे | Published: April 28, 2023 07:01 PM2023-04-28T19:01:52+5:302023-04-28T19:04:43+5:30
प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाल्यानंतरच उपोषण मागे घेण्याचा पवित्रा समितीतील सदस्यांनी घेतला आहे.
अहमदनगर : नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी स्मारक कृती समितीच्यावतीने प्रोफेस चौकात उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाल्यानंतरच उपोषण मागे घेण्याचा पवित्रा समितीतील सदस्यांनी घेतला आहे.
प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे नियोजित आहे. मनपा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे काम अद्याप सुरू झाले नाही. पूर्णाकृती पुतळा उभारण्याकरिता चौथाऱ्याच्या कामाची ई- निविदा प्रक्रिया झालेली असताना देखील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामास विलंब होत असल्याचे आरोप समितीने केला आहे. दरम्यान मनपाचे उपायुक्त यशवंत डांगे व बांधकाम विभागाचे उपअभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
पुतळ्याचा चौथरा व शुशोभिकरण संदर्भात स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे. समितीची मान्यता मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला तत्काळ कार्यारंभ आदेश देण्यात येईल, असे यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पुतळा ज्या ठिकाणी बसवयाचा आहे तो भूखंड ताब्यात घेऊन तेथे कंपाउंड तयार करा, अशी मागणी समितीने केली आहे. दरम्यान या उपोषणाला फुले ब्रिगेडच्यावतीने पाठिंबा देऊन पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले.